किराणा, भाजीपाल्यासाठी झुंबड !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे तर मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला २१ दिवसासाठी लाँकडाऊनल केले आहे.

परभणी : राज्यासह शहरात संचारबंदी लागू झालेली असताना मंगळवारी (ता.२४) रात्री व बुधवारी (ता.२५) सकाळी किराणा सामान खरेदी करण्यासाठी तसेच भाजीपाला खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली. गुढीपाडव्याचा उत्साह मात्र दिसून आला नाही.

‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे तर मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला २१ दिवसासाठी लाँकडाऊनल केले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अन्नधान्याची दुकाने खुली होती तर दुकानातून मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी झुंबड करीत असल्याचे चित्र होते. त्याचबरोबर बुधवारी गुढीपाडवा असूनही फारसा उत्साह नव्हता. गुढीपाडवा म्हटलं की, बाजारपेठेत वर्दळ व उत्साह संचारलेला असे. परंतू यावेळचे चित्र पूर्णतः भिन्न होते.

हेही वाचा - ‘कोरोना’ इफेक्ट : मास्क लावून उभारल्या गुढ्या !
रस्त्यावर शुकशुकाट 
मंगळवारी सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  संचारबंदीची अंमलबजावणी सुरु होण्यापूर्वी  लागू असतानाही अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडले होते. मंगळवारी देखील पोलिसांनी प्रसाद दिल्यानंतर मात्र अकरानंतर ही गर्दी पांगण्यास सुरुवात झाली व दुपारी चार वाजेपर्यंत रस्त्यावर शुकशुकाट होता. काही ठिकाणी मात्र उत्साही युवक रस्त्यावर डबल ट्रिपल सीट फिरत असतानादेखील दिसून आले.

हेही वाचा व पहा - Video: लढाई निश्चित जिंकणार; पण तुम्ही घर सोडू नका

 कोरोना बाधित अद्याप एकही नाही
 जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या शंभराच्या आसपास पोचलेली असताना एक समाधानाची बाब म्हणजे अद्यापही एकाही रुग्णास रिपोर्ट  बाधित म्हणून आलेला नाही हे सुदैवच. शहरासह जिल्ह्यात देखील विदेशातून येणाऱ्यांची संख्या मोठी असून राज्यासह देशाच्या विविध भागातून देखील मोठ्या प्रमाणावर नागरिक शहरात परतले आहेत. अनेक नागरिकांनी स्वतःला घरातच ठेवणे पसंत केले असून काही उत्साही मात्र अद्यापही याबद्दल गांभीर्य बाळगत नसल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग आपापल्यापरीने नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करीत आहेत त्याचबरोबर शहरात औषधांची फवारणी, धुरिळणी देखील महापालिकेने सुरू केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Groceries, Vegetable Crops!