‘कोरोना’ इफेक्ट : मास्क लावून उभारल्या गुढ्या !

कैलास चव्हाण
बुधवार, 25 मार्च 2020

‘कोरोना’च्या सावटाखाली बुधवारी (ता.२५) गुढी पाडव्याचा सण साजरा करण्यात आला असून मास्क लावून गुढ्या उभारण्यात आल्या आहेत.

परभणी : ‘कोरोना’च्या सावटाखाली बुधवारी (ता.२५) गुढी पाडव्याचा सण साजरा करण्यात आला असून मास्क लावून गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. नेहमी सारखा कोणताही उत्साह वा आनंद यावेळी दिसुन आला नाही.भितीदायक वातावरणात गुढी पाडवा साजरा केला जात आहे.

मराठी नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्याला होत असते. अनंतकाळापासून गुढी पाडव्याचे महत्व अबाधीत आहे. त्यात महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागात गुढी पाडव्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. ग्रामीण भागातील शेतीसह अन्य व्यवहार गुढी पाडव्यापासून सुरुवात होतात. शेती बटई लावण्यापासून ते सालगडी ठेवण्यापर्यंतचे व्यवहार या दिवसापासून सुरुवात होतात. ग्रामीण भागासह शहरी भागातदेखील हिंदु समाजात मोठ्या उत्साहात गुढी पाडवा साजरा केला जातो. 

हेही वाचा - ‘कोरोना’च्या सकंटाकालीन परिस्थितीत ‘आयएमए’ सरसावली

भितीदायक वातावरण
दरवर्षी गुढी पाडव्याला बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. किराणा साहित्यासह वाहनखरेदीसाठी मोठी गर्दी असते. मोठ्या उत्साहात नवे कपडे परिधान करुन घरावर गुढी उभारली जाते. विजयाचे प्रतिक म्हणून गुढीची पुजा केली जाते. त्यामुळे हा उत्साहवर्धक असा सण सर्वत्र साजरा होतो. यंदा मात्र, कोरोना विषाणुच्या सावटामुळे गुढी पाडवा भितीदायक वातावरणात साजरा करण्यात आला.

मास्क लावुन गुढी उभारली

सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठेत किराणा साहित्य, भाजीपाला यांची दुकाने सुरु होती. त्यामुळे सकाळी काही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. मात्र, त्यांच्यात कोणताही उत्साह नव्हता. सकाळी नऊच्या दरम्यान, घरोघरी गुढ्या उभारल्या जात असताना कोणताही आनंद वा उत्साह दिसुन आला नाही. अनेकांनी तोंडाला मास्क लावुन गुढी उभारली. तिही घरातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीमध्ये. त्यामुळे किती भिती बसली आहे,
ते दिसुन आले आहे.

हेही वाचा व पहा -​ Video : हंगेरीतून तरुणाचे भारतीयांना कळकळीचे आवाहन...

सोशल मिडीयावरच शुभेच्छा
दरवर्षी गुढी पाडव्याला एकमेकांना भेटुन,साखरेची गाठी दिली जाते. यंदा मात्र, ना भेट ना साखरेची गाठी. शुभेच्छा केवळ सोशल मिडीयावर दिल्या जात होत्या. अगदी जवळच्या मित्र-मैत्रीणीलादेखील लांबुनच शुभेच्छा दिल्या जात होत्या. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून देखील संवाद साधुन शुभेच्छा देण्यावर भर होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Throw in a scary environment