पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना तयारीचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाचशे कुटूंबाना महिनाभर पुरेल असे अन्नधान्याच्या किटचे गरजूंना वाटप केले. यावेळी आमदार रावसाहेब अंतापूरकर, आमदार अमरनाथ राजूरकर, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अरविंद बोळंके आदी उपस्थित होते. 

देगलूर, (जि. नांदेड) : कर्नाटक व तेलगंणा राज्याच्या बिदर व निझामाबाद येथील कोरोना विषाणू प्रादुर्भाव असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या लक्षात घेता, त्याचा शिरकाव नांदेड जिल्ह्यात होऊ नये व आवश्यक उपाय योजनांचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. आठ) देगलुर येथील पंचायत समितीच्या डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात घेतला.

धान्याच्या किटचे वाटप
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाचशे कुटूंबाना महिनाभर पुरेल असे अन्नधान्याच्या किटचे गरजूंना वाटप केले. यावेळी आमदार रावसाहेब अंतापूरकर, आमदार अमरनाथ राजूरकर, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अरविंद बोळंके आदी उपस्थित होते. उपलब्ध निधीतून देगलूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. 

हेही वाचा....जिल्ह्यात १८१ जण विदेशातून परतले

ब्लड बँक, रुग्णवाहिका मिळणार
तहसील कार्यालयात अशोक चव्हाण यांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन संदर्भात आढावा घेतल्यानंतर गरजू, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. देगलूर तालुक्यासाठी ब्लड बँक उपलब्ध होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत. तसेच कार्डियाक रुग्णवाहिका देखील देगलूरसाठी उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी मानवविकास अंतर्गत निधी दिला जाईल. तसेच रोहयो, पाणीटंचाई या विषयी देखील आढावा घेतला. 

हेही वाचलेच पाहिजे.... जुन्या नांदेडात पाण्याचा ठणठणाट

लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित
बैठकीस आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अरविंद बोळगे, गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, तालुका आरोग्य  अधिकारी डाॅ. आकाश देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सभांजी फुलारी, पोलीस निरीक्षक भगवान धाबडगे, तालुका कृषी आधिकारी शिवाजी शिंदे, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, वसंत नरवाडे, श्री पंगे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड, जिल्हा परिषदेचे सभापती अॅड. रामराव नाईक, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार उपस्थित होते.

लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे डब्यांची व्यवस्था
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या लॉक डाऊन मधील लॉयन्सचा डबा मध्ये तेरा दिवसात पाच हजार ३५० डब्याचे वितरण करण्यात आले. हनुमान जयंती निमित्त भाजप प्रदेश युवा मोर्चा प्रभारी संजय कोडगे आणि व्यापारी दिगंबर लाभशेटवार यांच्या हस्ते ६५० गरजूना डब्यामध्ये साखर भात वाटप करण्यात आल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.  

साडेआठ हजार डब्यांची नोंदणी
शहरातील ७७ अन्नदात्यांनी आठ हजार चारशे डब्याची नोंदणी केली आहे. नवीन अन्नदात्यामध्ये नांदेड युथ सी.ए. क्लब  तसेच भगवंत जोशी यांनी प्रत्येकी दिडशे, सौ. किर्ती गौतम धोका यांनी शंभर डबे आणि मुख्याध्यापक माधव इरवंता हाडपे यांनी पन्नास डबे दिले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालय, शहरउपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वजिराबाद पोलीस ठाणे तसेच शहर वाहतूक शाखा येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दुपारचे भोजन तसेच विद्यार्थी व आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवसातून दोन वेळेस पोळी भाजी वितरीत करण्यात येते. क्लब जवळ सध्या तीन हजार पन्नास डबे शिल्लक आहेत. जर लॉकडाऊनची मुदत वाढली तर आणखी किमान वीस अन्नदात्याची आवश्यकता असल्यामुळे नांदेडकरानी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष लॉ. डॉ. विजय भारतीया, उपाध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, सचिव लॉ. डॉ. मोहन चव्हाण, कोषाध्यक्ष लॉ. शिवा शिंदे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Ministers Review Corona Preparation, nanded news