नवरात्रोत्सव सणानिमित्त मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी 

राजेश दारव्हेकर
Friday, 2 October 2020

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळानी नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार यथोचित परवानगी घेणे आवश्यक राहील.

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादूर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता  ता. १७ ऑक्टोबर पासून साजरा करण्यात येत असलेला नवरात्रोत्सव या सणासंदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कलम १४४  नुसार संपूर्ण जिल्ह्याच्या हद्दीत नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत  आदेश दिले आहेत.

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळानी नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार यथोचित परवानगी घेणे आवश्यक राहील. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि नगरपरिषद, नगर पंचायत तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचें  मंडप उभारण्यात यावेत.

पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे

सार्वजनिक रस्ता अथवा सार्वजनिक जागेवर मंडप उभारण्यात येऊ नये. या वर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित आहे. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता चार फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची दोन फुटांच्या मर्यादेत असावी. जास्तीत जास्त चार व्यक्तींना मुर्तींची स्थापना व विसर्जन करता येईल. देवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनात चार पेक्षा जास्त व्यक्ती राहणार नाहीत. या वर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. 

हेही वाचाऔरंगाबादेत तब्बल १०६ किलो गांजा पकडला, महिलांसह दोघे अटकेत -

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नये

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नये. देवीच्या मूर्तीची पूजा  करणाऱ्या पुजाऱ्यांनी, मंडळातील सदस्यांनी सामाजिक अंतर, मास्क, स्वच्छता व आरोग्य विषयक बाबींचे पालन करुन पूजा करावी.

देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्यायी व्यवस्था

देवीच्या दर्शनासाठी मंडळानी ऑनलाईन  प्रक्षेपण, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक इत्यादीद्वारे उपलब्ध  करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी  फिजिकल डिस्टन्सींग, स्वच्छतेचे नियम, हँडवॉश व सॅनिटायझेशनची सुविधा, सर्वासाठी मास्कचा वापर इत्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

येथे क्लिक करा - हिंगोली : १७ लाख रुपये किमंतीचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत

देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक  पध्दतीतील  विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.  संपूर्ण गावातील , नगरातील, इमारतीतील  सर्व घरगुती  देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

नवरात्रोत्सव कालावधीत शेजारील तसेच बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये

तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी  नवरात्रोत्सव कालावधीत शेजारील तसेच बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. व्यक्तीच प्रेक्षकांना फेसबूक व इतर समाज  माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guidelines should be implemented on the occasion of Navratri festival - Collector Ruchesh Jayanshi hingoli news