esakal | Marathwada Rain : मराठवाड्यासाठी हवे ८४५ कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

मराठवाड्यासाठी हवे ८४५ कोटी

Marathwada Rain : मराठवाड्यासाठी हवे ८४५ कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या तुफानी पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. या पावसामुळे सर्व जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने दहा लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. शिवाय जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. या नुकसानीतून मराठवाड्याला सावरण्यासाठी सुमारे ८४५ कोटी ७९ लाख रुपयांच्या मदतीची गरज असल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे.

सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली होती. तर गेल्या दोन दिवसात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, मुग, उडीद, भुईमूग आदी पिके होत्याची नव्हते केले. कपाशी, मका, ऊस, मोसंबी, बाजरी आडवी झाली. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून मुळ्या कुजत आहेत, पिके पिवळी पडत आहेत. नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने पिकांसह जमीन खरवडून गेली. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाने सोमवार (ता. २७ ) आणि मंगळवारी (ता. २८ ) झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची आकडेवारी आणि त्यासाठी अपेक्षित निधी याबाबत प्राथमिक अहवाल तयार केला आहे.दोन दिवसात आठही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि अनेक घरांची पडझड झाली.

नुकसान भरपाईसाठी अपेक्षित निधी किती लागेल, याचा प्राथमिक अहवाल दोन दिवसातील मुसळधार पावसाने विभागातील १२ लाख ३ हजार ९५८ शेतकऱ्यांच्या १० लाख ५६ हजार ८४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी तब्बल ७१० कोटी १५ लाख ६३ हजार ४०० रुपयांच्या आर्थिक मदतीची गरज भासणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १०४ गावांचा संपर्क तुटलेला आहे तर नऊ गावे पुराच्या वेढ्यात आहेत त्याठिकाणी प्रशासनाकडून मदत केली जात आहे. ७७७ लोक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान केले आहे. जिल्हा परिषदेची एक शाळा पडली आहे. १७ तलाव फुटले आहेत. २९३ ठिकाणी महावितरणची नुकसान झाले आहे. दोन दिवसात पावसाने ८४५ कोटी ७९ लाख ६१ हजार ७१२ रुपयांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज अहवाल तयार करण्यात आला आहे.

असे झाले नुकसान

  • १२ लाख ३ हजार ९५८ शेतकरी बाधित.

  • दहा लाख ५६ हजार ८४८ हेक्टर बाधित. २५ हजार २०० पंचनामे.

  • दोन दिवसात २२ जणांचा मृत्यू तर ३१९ दुभती जनावरे दगावली.

  • पुरात १४६ लहान जनावरे वाहून गेले आहेत.

  • पक्क्या ११ घरांची पूर्णपणे तर १ हजार ८८१ घरांची अंशतः पडझड.

  • नदीकाठची ४४० पूरग्रस्त गावे अद्यापही धोकादायक परिस्थितीत.

loading image
go to top