‘या’ ठिकाणी पकडला सव्वा लाखांचा गुटखा

सद्दाम दावणगीरकर
Thursday, 9 April 2020


राज्य शासनाच्या गुटखा विक्री व वाहतूक बंदीला बगल देत या भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर कायमस्वरूपी आळा घालण्याची भूमिका ना अन्न व औषधी प्रशासनाची ना स्थानिक पोलिसांची. अशीच काहीशी गत झाली आहे. सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात संचारबंदी लागू असताना या भागात गुटख्याची वाहतूक होत असल्यास यापेक्षा नवल काय होईल? अशाच प्रकारे गुटखा वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर कार्यवाही करीत सुमारे एक लाख चोवीस हजारांचा गुटखा मरखेल पोलिसांनी गुरुवारी (ता.नऊ) रोजी जप्त केला आहे.

मरखेल, (ता. देगलूर, जि. नांदेड) ः सीमावर्ती कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात गुटखा वाहतूक करून विक्री करण्याचा गोरखधंदा संचारबंदीच्या काळातही नेहमीप्रमाणेच जोमात सुरू आहे. राज्य शासनाच्या गुटखा विक्री व वाहतूक बंदीला बगल देत या भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर कायमस्वरूपी आळा घालण्याची भूमिका ना अन्न व औषधी प्रशासनाची ना स्थानिक पोलिसांची. अशीच काहीशी गत झाली आहे. सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात संचारबंदी लागू असताना या भागात गुटख्याची वाहतूक होत असल्यास यापेक्षा नवल काय होईल? अशाच प्रकारे गुटखा वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर कार्यवाही करीत सुमारे एक लाख चोवीस हजारांचा गुटखा मरखेल पोलिसांनी गुरुवारी (ता.नऊ) रोजी जप्त केला आहे.

 

हेही वाचा -  महामानवास रक्तदानातून अभिवादन

प्राप्त माहितीनुसार, मरखेल पोलिस ठाण्याचे पोलिस नायक शब्बीर शेख व पोलिस शिपाई संभाजी पाटील हे झरी परिसरात (ता. नऊ) रोजी सकाळच्या सुमारास कोरोना आजाराच्या निमित्ताने लागू करण्यात आलेल्या संचारबंदी काळात गस्त घालीत होते. यातील महिंद्रा मॅक्सिमो वाहन क्र. (एम.एच.२६ एके २०४२) हा औराद जि. बिदर (कर्नाटक) येथून देगलूरकडे याच मार्गे जात असताना सदर वाहन अडवून चौकशी केली असता, त्यामध्ये राज्यात बंदी असलेला सागर नावाचा गुटखा आढळून आला. वाहनचालक हा फरार झाला आहे. या वाहनात अंदाजित सुमारे एक लाख चोवीस हजार रुपये किमतीचा गुटखा असल्याचे सांगण्यात येते.

 

संचारबंदी नियमांचे उल्लंघन
दरम्यान सदरील वाहनासहीत (अंदाजित किंमत दोन लाख) असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान सीमावर्ती या भागातून गुटखा वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते हे नवीन नाही. तोकड्या मनुष्यबळावर जिल्हा मुख्यालयातून कारभार हाकणाऱ्या अन्न व औषधी प्रशासन मात्र आपल्या मनुष्यबळाच्या नावाखाली हात वर करून मोकळे होण्याची यशस्वी भूमिका नेहमीच पार पाडत असतो. स्थानिक पोलिसांनी या पोलीस ठाणे हद्दीत आजपर्यंत कोट्यवधींचा गुटखा वाहनांसह जप्त करून कार्यवाही केली आहे. दरम्यान सध्या लागू असलेल्या संचारबंदी काळात या भागात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री व वाहतूक करून संचारबंदी नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

 

धूम्रपान करून एकप्रकारे आमंत्रणच
सीमावर्ती भागात हणेगाव व भूतनहिप्परगा याठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या. शिवाय बऱ्याच ठिकाणी रस्ते फोडून गावबंदी करण्यात आली असताना हा गुटखा आलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या काळातही सहजपणे किराणा दुकान व अन्य ठिकाणी सहजपणे गुटखा, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची उपलब्धता होत असल्याने कोरोनासारख्या महाभयंकर आजारातून वाचविणे तर सोडाच उलट धूम्रपान करून एकप्रकारे आमंत्रणच दिले जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha caught in the village of Merkel, nanded news