esakal | मराठवाड्यात आंध्र, कर्नाटकातून गुटखा
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

लागेबांध्यांमुळे सुळसुळाट 
प्रशासनातील काहींचे लागेबांधे परराज्यातील गुटखा राज्यात येण्यास कारणीभूत आहेत. बहुतांशवेळा गुटख्याची वाहतूक सार्वजनिक वाहनातूनही छुप्या पद्धतीने होत असल्याचे प्रकार घडले; परंतु वाहने खासगी असो की सार्वजनिक काणाडोळा, अर्थकारणामुळे गुटख्याला सुकर वाट निर्माण होते, अशी माहिती पूर्वाश्रमीच्या गुटखा व्यावसायिकाकडून प्राप्त झाली. 

मराठवाड्यात आंध्र, कर्नाटकातून गुटखा

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद - राज्यात गुटखाबंदीनंतर संधी साधून गुटख्याच्या 'उद्योगात' अनेकांनी भरारी घेतली. महाराष्ट्रात उत्पादन थांबल्यानंतर कर्नाटक व आंध्रप्रदेश या शेजारी राज्यांतून उत्पादित गुटखा विक्रीसाठी राज्यात येऊ लागला. औरंगाबादेतही छुप्या पद्धतीने गुटख्याची मोठी वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे खासगी वाहनासोबतच सार्वजनिक वाहनातूनही चोरून वाहतूक केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

बंदीआड संधीचा फायदा घेत परराज्यातील गुटख्याचा माल शहरात आयात केला जात आहे. आंध्रप्रदेश, कनार्टक मार्गाने शहरात येण्यास धोका वाढत असल्याची जाणीव झाल्यानंतर मार्ग बदलून या मालाची वाहतूक गंगापूर, वाळूजमार्गे शहरात होताना दिसते. खासकरून गुटख्यावर औरंगाबादेत मोहीम सुरू झाल्यानंतर साठवणूक लासूर स्टेशन, जालना, करमाड, शेकटा येथे होत आहे. मध्यंतरी गुटख्याचा मोठा माल ग्रामीण पोलिसांनी करमाड-शेकटा रस्त्यावरील गोदामातून जप्त केला होता. लाखो रुपयांचा माल ट्रक भरून आंध्र, कर्नाटकमधून येत असल्याची बाब समोर आली होती. बंदी असतानाही एका महिन्यात कोट्यवधींची उलाढाल या धंद्यातून शहर व परिसरात केली जात आहे. 
 

बनावट मालाचा सुळसुळाट 

आरोग्याला घातक असताना गुटखा सेवन केला जातो; परंतु गुटख्यातही भेसळ असून, नकली मालही अस्सल म्हणून विकला जातो. यामुळे आणखीनच आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. बनावट गुटख्याच्या मालाचा शहरात सुळसुळाट असून, या मालाचे विक्रेते आपली तिजोरी भरत आहेत. 
 
कोणत्या भागात साठवणूक 
शहरातील किराडपुरा, जिन्सी, सिटी चौक, बीड बायपाससह शहरालगतच्या परिसरात व पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात गुटख्यांची साठवणूक केली जाते. गोदामात हा माल ठेवण्यात येत असून, घरातही माल दडवून ठेवण्यात आल्याचे प्रकार कारवाईवरून समोर आले आहेत. 

अशीही स्थिती 
बहुतांश जुन्या व्यापाऱ्यांनी गुटखा बंदीनंतरही "दुकान' चालविले; परंतु आता गुटख्याच्या व्यवसायात 'अर्थ' राहिला नाही. कारवाया आणि छुप्या पद्धतीने गुटखा साठवणूक करणे सोपे नसल्याने आता या व्यवसायाकडे काहींनी पाठ फिरवली, अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. 
 

असा हवा चाप 

  • परराज्यातील गुटखा राज्यात येतो, त्यावेळी सीमावर्ती भागात चेकपोस्ट उभारण्याची गरज आहे. 
  • मालाची तपासणी, संशयास्पद वाहन व चालकांची चौकशी व्हावी. 
  • विशिष्ट प्रकारच्या वाहनातून गुटखा वाहतूक होते, अशा वाहनांवर पाळत ठेवायला हवे. 
  • खबऱ्यांचे नेटवर्क उभारून धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाने कराव्यात. त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. 

या मार्गावरून वाहतूक 

  • कनार्टक, आंध्रप्रदेशातून सोलापूर-बीडमार्गे खासगी वाहनांतून शहरात गुटखा येतो. 
  • विविध भागांत हा माल वितरित केला जातो. 
  • जास्त गतीच्या वाहनांचा वापर गुटखा वाहतुकीसाठी होतो. यात छोट्या वाहनांना प्राधान्य दिले जाते. 
  • गोदामात साठवणूक केल्यानंतर छोट्या ग्राहकांना माल वितरित केला जातो. 
  • दुपटीपेक्षा अधिक दराने गुटखा ग्राहकांना विकला जातो. 
loading image
go to top