महिलांचे हंडाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण

अमोल तांदळे
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

हंडाभर पाण्यासाठी रात्रभर हापशावर थांबावे लागते. गावातील पुढारी काहीच लक्ष देत नाहीत. दोन दिवसांत टॅंकर नाही सुरू झाले तर आम्ही सर्व महिला पंचायत समितीत जाऊन बसणार आहोत.
- महानंदा आहिरे, गोलंग्री

चौसाळा - सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोकांना दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. बीड तालुक्‍यातील गोलंग्री गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्रभर हातपंपावर जागरण करावे लागत आहे. रात्रभर जागरण केल्यावर फक्त हंडाभरच पाणी मिळते; कारण या गावात फक्त एकच हातपंप आहे. यामुळे महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ऑगस्टमध्येच दुष्काळ जाहीर केलेला आहे. तरीदेखील या गावात अद्यापपर्यंत टॅंकर सुरू केले नाही.

येथील सरपंच अंगद कवडे यांनी गावच्या पाणीपुरवठ्यासाठी तीन महिन्यांपासून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे; परंतु अद्यापपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. येथील महिला हंडाभर पाण्यासाठी रात्रभर हातपंपावर जागरण करून दिवसभर सांडपाण्यासाठी गावाभोवताच्या परिसरात एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वणवण भटकंती करीत आहेत. विशेष म्हणजे शाळेतील अगदी दुसरी - तिसरीच्या मुली सुट्यांचा आनंद लुटण्याचा सोडून कळशी, हंडाभर पाण्यासाठी दिवसभर वणवण भरउन्हात भटकंती करीत आहेत. पाण्यामुळे तर काही ग्रामस्थ तीन - चार दिवसांतून एकदाच अंघोळ करतात. 

विशेष म्हणजे या गावाची पाणीपुरवठा योजना गेल्या सात - आठ वर्षांपूर्वीच मंजूर झालेली आहे; परंतु अद्यापपर्यंत ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे येथील गावकऱ्यांचा  उन्हाळ्याबरोबर पावसाळ्यातही पाणीप्रश्‍न कायम आहे. 

गावच्या टॅंकरचा प्रस्ताव महसूल विभागातील अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने रखडला आहे. आज दिवसभरात संबंधित अधिकाऱ्यांना टॅंकर सुरू करण्यास भाग पाडून उद्या गोलंग्रीला भेट देणार आहे. 
- अशोक लोढा, जिल्हा परिषद सदस्य

 गावातील पुढाऱ्यांनी पाणीपुरवठा योजना खाल्ल्यामुळे गावकऱ्यांवर ही वेळ आली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामातही गावात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. शासनाने सर्व दोषींकडून शासनाच्या पैशाची वसुली करावी. सध्या तत्काळ टॅंकर सुरू करावे.
- श्रीकांत कवडे, सामाजिक कार्यकर्ते, गोलंग्री

Web Title: Handpump Water Shortage Women Night