परभणीकरांसाठी आनंदाची बाब, नव्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

महापालिकेने अखेर नव्या जलकुंभातून नव्या वितरण व्यवस्थेतून नव्याने झालेल्या नळजोडण्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच जुन्या जलकुंभांनादेखील नवीन योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती असून त्यामुळे त्या नागरिकांनादेखील आता दर आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाईचे संकट दूर होण्याची शक्यता आहे

परभणी ः महापालिकेने अखेर नव्या जलकुंभातून नव्या वितरण व्यवस्थेतून नव्याने झालेल्या नळजोडण्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच जुन्या जलकुंभांनादेखील नवीन योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती असून त्यामुळे त्या नागरिकांनादेखील आता दर आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी नव्याने नळजोडण्या घेतल्या त्या नागरिकांवरील पाणीटंचाईचे संकट दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या यूआयडीएसएसएमटी व अमृत पाणीपुरवठा योजना सहा महिन्यांपूर्वीच कार्यान्वित झाल्या आहेत. परंतु, नवीन वितरण व्यवस्थेवर नळजोडण्यांसाठी नागरिक पुढे येत नसल्यामुळे प्रशासन त्या भागात पाणीपुरवठा करू शकत नव्हते. तसेच लॉकडाउनचादेखील नवीन नळजोडणी घेण्यावर परिणाम झाला. त्यामुळे ज्या भागात खऱ्या अर्थाने नळजोडण्या व पाण्याची खऱ्या अर्थाने गरज होती, त्या भागातूनच प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनदेखील हतबल झाले होते. तर दुसरीकडे जुन्या योजनेला नवीन योजनेतून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रशासनावर दबाव वाढत होता.

हेही वाचा - युवकाने मदतीतून श्रमजिवी लोकांचा स्वाभिमानही जपला, कुठे ते वाचा...

नवीन नळजोडण्यांना आली गती
ज्या भागात नळजोडण्या नव्हत्या, त्या भागातील नळजोडणी घेणाऱ्या नागरिकांना तूर्त मालमत्ता कर न भरण्याची सवलत दिली आहे. तरीदेखील फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढताच नळजोडणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक अर्ज देत असल्याचे चित्र दिसून येते. ज्या भागात नळजोडण्या झाल्या, त्या भागाला पाणीपुरवठादेखील सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दर्गा रोड येथील नव्या जलकुंभातून नव्या वितरण व्यवस्थेवर गुरुवारी (ता. सात) प्रथमच पाणी सोडण्यात आले. तर पार्वतीनगर येथील जलकुंभावरील वितरण व्यवस्थेवर शनिवारी (ता. नऊ) पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते व्हॉल्व उघडण्यात आला. त्यामुळे ज्यांनी नवीन नळजोडण्या घेतल्या त्यांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळणार आहे. ज्या लाइनवर ७० ते ८० पेक्षा अधिक नळजोडण्या होतील, त्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा - व्यापाऱ्यांना मेसेजद्वारे महासंघाने केल्या सूचना, कोणत्या ते वाचा...

जुन्या नळधारकांनाही मिळणार दिलासा
शहरातील जुन्या जलकुंभांना नव्या योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे जुन्या नळधारकांनादेखील दिलासा मिळणार असून त्यांनादेखील दर १२ ते १५ दिवसांनंतर मिळणारे पाणी आठ-दहा दिवसांला मिळण्याची शक्यता आहे.

पन्नास हजार नवीन नळजोडणीचे उद्दिष्ट
शहरात जवळपास ८० हजार मालमत्ता असून त्यापैकी ५० हजार नवीन नळजोडण्या होतील, अशी पालिकेला अपेक्षा आहे. सद्यःस्थितीत पालिकेकडे ज्या भागात नळयोजना नाही, त्या भागातील साडेतीन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी नळजोडणीची मागणी करणारे अर्ज दाखल केले आहेत. सध्या साहित्य मिळण्यास येणाऱ्या अडचण असून लॉकडाउन उठल्यास नळजोडणीला गती येण्याची शक्यता आहे. नव्या भागात १२ ते १५ हजार नळजोडण्या होण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happily For Parbhanikars, Water Supply Started Through New Aqueducts, parbhani news