coronavirus - शेती, शेतकरी आणि कोरोना...असे बदललेय ग्रामीण जीवन

Dr. Rupesh more
Dr. Rupesh more

औरंगाबाद - लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतीउद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करत असतो. खरिपात झालेला अतिपाऊस, मका, कपाशी यासारख्या पिकांवर आलेले रोग यामुळे घटलेले उत्पादन आणि पडलेल्या बाजारभावामुळे खरिपात शेतकऱ्यांच्या हाताला काही फार लागले नाही. आता रब्बीतही कोरोनाचे संकट उभे राहिले आहे.

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे गेल्या २२ मार्चपासून देश लॉकडाऊन आहे. याची झळ सर्वच क्षेत्राला बसलीय. शहरातून गावी परतणारे मजूर, कामगार, परप्रांतीय. शहरात भाजीमार्केटमध्ये उगीच होणारी गर्दी, गस्त घालणारे पोलिस, रुग्णांची काळजी घेणारी आरोग्य यंत्रणा, स्वतःचीच काळजी घेणारे शहरवाशीय, गरजूंना मदत करणारे दानशूर असे चित्र सध्या समाज माध्यमांची घरबसल्या दिसतेय. शहरी संस्कृतीचा प्रभाव असणारे सामान्य जणही पॉझिटिव्ह रुग्णांच्या जाती शोधण्यात मग्न आहेत. असे असले तरी शेतकरी बांधवांवर या आजाराचे काय परिणाम होत आहेत, याकडेही लक्ष गेले पाहिजे.

लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करत असतो. खरिपात झालेला अतिपाऊस, मका, कपाशी यासारख्या पिकांवर आलेले रोग, घटलेले उत्पादन, पडलेले बाजारभाव यामुळे खरिपात शेतकऱ्यांच्या हाताला फार काही लागले नाही. कपाशी, मका, सोयाबीन यासारखी पिके लवकर काढून शेतकऱ्यांनी रब्बीसाठी आपली राने लवकर मोकळी केली. यावर्षी रब्बीला जरा बरे पाणी आहे. कमी कालावधीचे पीक घेऊन दोन पैसे हातात येतील, या एकाच आशेवर पदरमोड करून गहू, कांदे, टोमॅटो, टरबूज, काकडी, कोथिंबीर अशी पीके शेतकऱ्यांनी लावली होती. गहू व कांदा सोडला तर बाकी पिके ही रोजच्या रोज काढून बाजारात विक्रीसाठी न्यावी लागतात, नाही तर ती खराब होतात. 

आज लॉकडाऊनमुळे शेतात मजूर कामाला येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही आणि नेलेच बाजारात तर विकल्या जाईल, याची कोणतीही हमी नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सोडून द्यावा लागत आहे. टरबुजासारखे पीक आहे. साधारणपणे मार्चपासून टरबूज बाजारात येतात. आंबा बाजार येण्याआधी आपले टरबूज हे विकल्या गेले पाहिजे याचे नियोजन करून शेतकरी लागवड करतो. एप्रिल महिना हा टरबुजाच्या बाजारासाठी खूप योग्य महिना मानला जातो.  

साधारण सात ते दहा रुपये भाव हा शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असतो. अलीकडे आधुनिक शेतीच्या जमान्यात टरबुजासाठी लागवड व देखभालीचा खर्च मोठा आहे. शेतकरी तो सर्व करून बसला आहे आणि आज उभे पीक सोडून देण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. ही टरबुजाची जशी गत आहे तशीच ती काकडी, टोमॅटोे, वांगी याही पिकांची आहे. लग्नाचा सिजन डोळ्यासमोर ठेवून मोठ्या आशेने लावलेली, फुलवलेली ही पीके सोडून देताना शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

कांद्यासारखे पीक शेतात तयार आहे; पण बाजारात पाहिजे तसा भाव नाही, ग्राहक नाही ही मोठी परवड आहे. गहू शेतकऱ्यांच्या शेतात सोंगणीसाठी तयार आहे; पण काढणीसाठी मजूर नाही. हार्वेस्टरने काढायचा म्हटलं तर जिथे एकरी एक हजार रुपये ते घ्यायचे ते आता एकरी तीन ते चार हजार रुपये मागत आहेत.

बरं लॉकडाऊनचे संकट कमी की काय त्यात अवकाळी पावसाने अजून संकटात भर टाकली. शेतात सोंगणीला तयार असलेला गहू अवकाळी पावसाने खराब होण्याची भीती आहे. ज्या गव्हाला किमान दोन हजार ते बावीसे रुपये  क्विंटल भाव अपेक्षित होता, तिथे आज पंधराशे रुपये क्विंटलने मागितला जात आहे. तीच अडचण दुधाची आहे. दूध कोणीही घ्यायला आज तयार नाही. शहरात त्याला ते दूध नेऊन विकणे शक्य नाही. सरकारने दूध घेण्याची घोषणा केली असली तरी त्यांचा दूध घेण्याचा कोटा मर्यादित आहे. याउलट परिस्थिती किराणा मालाची आहे. जो माल शेतकऱ्यांकडून घेऊन व्यापारी व दलालांनी गोदामे भरून ठेवली आहेत, त्या मालाचे म्हणजे शेंगदाणे, खाद्यतेलाचे दर लॉकडाउनमध्ये वाढतच आहेत.

लॉकडाउनची परिस्थिती अजून अशीच कायम राहिली, तर शेतक-यांच्या समोरील अडचणी वाढत जातील. शेतकरी नेत्यांनी, समाजातील शेतीविषयी आस्था असलेल्या बुद्धिजीवी मंडळींनी हे शेतकऱ्यांचे प्रश्न जगासमोर मांडायला हवेत. शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळायलाच हवी. शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळात कशी मदत करायची याचा जरूर विचार व्हावा, अशी अपेक्षा डॉ. रूपेश मोरे यांनी व्यक्त केली.

(लेखकाचा संपर्क - ९०२८६८४४८८. ई मेल morerupesh88@gmail.com)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com