गावात आले चारचाकीतून, गोळा केले महिलांचे पैसे अन् केला पोबारा  

mmm.
mmm.

सोनपेठ ः तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना पॅकेजिंगचे काम देतो म्हणून हजारो रुपयांची लूट करणाऱ्या बोगस महिलांनी हाताला काम मिळेल या आशेने नोंदणी शुल्क भरलेल्या असंख्य गरजू महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. यामुळे दिवसभर गावात चारचाकीतून आलेल्या अन् पैसे घेत पोबारा केलेल्या टोळीची चर्चा रंगली होती. फसवणूक होऊनही अनेकांनी मुग निळून गप्प बसणे पसंत केल्याचे न दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन दिसून आले.  

तालुक्यातील शिर्शी बु. येथील दलित वस्ती भागात राहणाऱ्या काही बेरोजगार महिलांकडे (ता.१३) रोजी सकाळी आठच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून काही महिला व पुरुष आले. संबंधित महिला या त्या भागातील काही घरी जाऊन थेट स्थानिक महिलांना भेटून आम्ही जनसेवा लघुउद्योग विकास (महाराष्ट्र) या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या पोषण आहाराचे काम करणार असून त्यासाठी आम्हाला धान्य व काही वस्तू पॅकेजिंग करून हव्या आहेत. त्यासाठी तुम्ही आमच्या संस्थेकडे नोंदणी करा; तसेच नोंदणी शुल्क म्हणून दोनशे रुपये जमा करा अशी बतावणी केली. आधीच हाताला काम नाही आणि दुष्काळी परिस्थितीमुळे हताश झालेल्या स्थानिक असंख्य महिलांनी त्या बनावट महिलांकडे हजारो रुपये जमा केले. हे सर्व पैसे जमा करून त्या बनावट महिला व पुरुष गावातून पळून गेले. याबाबत उशिरापर्यंत सोनपेठ पोलिसात कुठलीही तक्रार दाखल झाली नव्हती. तालुक्यात याआधी देखील असे प्रकार झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 

त्या महिलांनी कामबंद करून पळ काढला 
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सोनपेठ तालुका व्यवस्थापिका नसिमा सय्यद व त्यांच्या सहकारी विजयमाला ठेंगे या कार्यालयीन कामकाजासाठी (ता.१३) रोजी शिर्शी येथे गेल्या असता त्यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. यावेळी सय्यद यांनी त्या बनावट महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली; तसेच त्या महिलांनी आपले काम बंद करून तिथून पळ काढला. यावर गावातील काही नागरिक व महिलांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना त्यात अपयश आले नाही. 

खूनप्रकरणी आजोबास पोलिस कोठडी 
सेलू : तालुक्यातील चिकलठाणा (बु.) येथे सातवर्षीय मुलाच्या खूनप्रकरणी चुलत आजोबास न्यायालयाने मंगळवारी (ता. १३) दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांनी ही माहिती दिली. घरामोसर खेळत असलेल्या अभिराज श्रीराम जाधव (वय सात) याचा, त्याचे चुलत आजोबा डिगांबर जाधव (वय ५६) याने सोमवारी (ता.१२) दुपारी गळा दाबून, विळ्याने वार करून खून केला. पोलिसांनी डिगांबर जाधवला ताब्यात घेतले. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांनी त्याला आज न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

मानवत तालुक्यातील महिलेची सेलू तालुक्यात आत्महत्या 
सेलू ः इरळद (ता.मानवत) गावातील रहिवासी असलेल्या एका पंचावन्न वर्षीय महिलेने सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी शिवारातील एका झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.१३) सकाळी घडली. कमलबाई बळीराम शिंपले असे या महिलेचे नाव असून निपाणी टाकळी (ता.सेलू) शिवारातील एका शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कांहीच्या निदर्शनास आले. सेलू पोलिसांना याबत माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटतीर्थवाले व पोलिस कर्मचारी शेख गौस घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून मृतदेह सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. शनिवारी (ता.दहा) कुटूंबियांशी कुरबुर झाल्याने त्या घरातून निघून गेल्या होत्या अशी माहिती मिळाली. मंगळवारी निपाणी टाकळी शिवारात महिलेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी तपास पोलिस करीत आहेत. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com