‘यांनी’ केला नवीन वर्षात संकल्प

file photo
file photo

नांदेड - मावळत्या २०१९ वर्षाला निरोप आणि नवीन २०२० वर्षाचे स्वागत सध्या सर्वत्र सुरू आहे. नवीन वर्षात नवीन संकल्प करणारेही अनेक जण असतात. नवीन वर्षात कोणी कोणता संकल्प केला, याचीही उत्सुकता सर्वांनाच असते. नांदेडमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचा संकल्प मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
 


विद्यापीठ जागतिक क्रमवारीत नेण्याचा प्रयत्न
विद्यापीठाच्या राष्ट्रीय मानांकनाच्या रॅंकिंग श्रेणीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला पहिल्या १५० मध्ये स्थान मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठासोबत महाविद्यालयाचे ही आंतरराष्ट्रीयकरण करण्यावर भर असणार आहे. नाविन्यपूर्ण रोजगारक्षम कोर्सेसची निर्मिती, संकुलातील वाढत्या विद्यार्थांची संख्या पाहता प्रवेश क्षमता वाढविण्याचा विचार, कर्मचाऱ्यांना आवश्‍यक त्या सोयी-सुविधा या बरोबरच त्यांना प्रशिक्षण देणे, शिवाय रडखडलेले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असणार आहे. जलसाक्षरतेवर लवकरच अभ्यासक्रम तो व्यवस्थापन विषयांमध्ये समावेश करण्यात येऊन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. विद्यार्थी, प्राचार्य यांचा संवाद, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक दालन, शैक्षणिक कक्षा रुंदावून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. उच्च शिक्षणातील नवीन प्रवाह ओळखून विद्यापीठ व ‌महाविद्यालये अधिक आधुनिक कशा प्रकारे करता येतील, याचा प्रयत्न शासनाकडून, औद्योगिक व वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्ध करून विद्यापीठाच्या भौतिक विकासाबरोबरच संशोधन, अध्ययनावर भर, ओद्योगिक क्षेत्राच्या सहकार्याने रोजगार, स्वयंरोजगार निर्मितीवर भर देण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. उद्धव भोसले,
कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

नव्या वर्षात आरोग्य, शिक्षणावर भर देणार
नववर्षात जिल्ह्यात आरोग्य तसेच शिक्षणाबाबत सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्याचा संकल्प आहे. नवीन वर्षात जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी पायाभूत सुविधांवर लक्ष देण्यात येणार आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबच या रुग्णालयांच्या शल्यचिकित्सागृहांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करून मुलांना भौगोलिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
- अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी.

स्वच्छ, सुंदर व हरित शहरावर भर
नांदेड शहराची ओळख जगभर असून नांदेड शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासोबतच नांदेडच्या सर्वांगीण विकासावर भर राहणार आहे. सध्या खड्ड्यांचा प्रश्‍न महत्त्वाचा असून सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येतील. त्याचबरोबर पाणीसाठा मुबलक झाला असून आता पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यावर भर राहील. तसेच मालमत्ता करासंदर्भात जनजागृती करून मागील थकबाकी शून्य करण्याचा तसेच नवीन कराची मागणीदेखील शंभर टक्के वसूल करण्याचा प्रयत्न राहील. महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांकडून मागवून त्या बाबत योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. आरोग्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यासोबतच प्रत्येकाला घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी पंतप्रधान घरकुल योजना आणखी चांगल्या पद्धतीने राबविण्याचा मानस आहे.
- लहुराज माळी, आयुक्त, नांदेड महापालिका.

लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभारावर भर
लोकाभिमूख आणि पारदर्शक राहून सर्व योजनांचा लाभ नांदेडच्या ग्रामीण जनतेपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत आम्ही सर्वांनी केला आहे. या वर्षीदेखील आम्ही आमचा रक्तक्षयाविरुद्धचा लढा अखंडपणे चालू ठेवणार आहोत. ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक करणे, गर्भवती मातांसाठी दुर्गा बाळ गणेश महोत्सव तसेच दर सोमवारी अंगणवाडीतील व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आयएफएच्या गोळ्या देणे, पाचवी व आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेस बसविणे, दहावीच्या निकालात अमूलाग्र वाढ करणे, घरोघर नळांद्वारे पाणीपुरवठा करणे, ग्रामीण रस्त्यांमध्ये दुरुस्ती करणे, नवीन घरकुल बांधणे आदी कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याचा संकल्प नवीन वर्षात केला आहे. आपल्या सर्वांच्या साथीने तो पूर्णत्वास येईल, हे निश्चित.
- अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.


सुसंवाद वाढविण्यावर भर देणार
पोलिस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासोबतच सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपले विशेष प्रयत्न राहतील. नवीन वर्षात शिक्षेचे प्रमाण वाढविणार. विशेष करून महिला आणि बालकांच्या प्रकरणात विशेष दखल घेऊन गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यावर भर राहील. पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या पोलिस चौकीच्या माध्यमातून नांदेडकरांशी सुसंवाद साधणार, तसेच शहरातील छेडछाडीच्या घटना व अन्य गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुंडागर्दीवर नियंत्रण मिळवले असून येणाऱ्या वर्षातही अशा गुंडागर्दीच्या घटना घडणार नाहीत, याची दक्षता घेऊन गुन्हेगारांवर आणखी कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- विजयकुमार मगर, पोलिस अधीक्षक, नांदेड.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com