esakal | ‘आरोग्या’त अखेर पदोन्नतीचा डोस, मराठवाड्याच्या वाट्याला ३२ अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

2Sakal_20News_11

कोरोनाच्या कहरातही धोरणात्मक पदांवर अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशा महत्त्वाच्या संवर्गाची ७० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. याचा ‘सकाळ’ने पाठपुरावा केला.

‘आरोग्या’त अखेर पदोन्नतीचा डोस, मराठवाड्याच्या वाट्याला ३२ अधिकारी

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोनाच्या कहरातही धोरणात्मक पदांवर अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशा महत्त्वाच्या संवर्गाची ७० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. याचा ‘सकाळ’ने पाठपुरावा केला. त्यामुळे आता वर्ग-एक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या झाल्या असून, बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागामधील प्रभारीराज संपले आहे. या पदोन्नत्यांमधून मराठवाड्याच्या वाट्याला ३२ अधिकारी मिळाले आहेत. यात ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांना अधीक्षकांसह अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकही भेटले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढता... वाढता ... वाढे !


आरोग्य विभागात प्रभारीराज असल्याने आरोग्य व्यवस्थापन विस्कळित झाले आहे. सरकारची उदासीनता आणि सोयीच्या खुर्च्यांवर बसलेल्या अधिकाऱ्यांची आडकाठी यामुळे पदोन्नत्या रखडलेल्या होत्या; मात्र अखेर सरकारच्या दोन पक्षांतील ‘इगो’ दूर झाला आणि पदोन्नत्यांची फाइल क्लीअर होऊन मंगळवारी (ता. १५) ८७ वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ पदांवरील अधिकाऱ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गात बढती मिळाली. परिणामी, आरोग्य विभागात मराठवाड्याच्या वाट्याला ३२ आणि बीड जिल्ह्याच्या वाट्याला आठ वर्ग-एकचे अधिकारी भेटले.

त्यामुळे उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि स्त्री रुग्णालयांत अनेक वर्षांपासून असलेले प्रभारीराज संपूण पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षकांच्या हाती आता पदभार येईल. रिक्त पदे, पदोन्नत्या रखडण्याची व रिक्त पदांची कारणे तसेच आरोग्य विभागात रिक्त पदांमुळे प्रभारीराज याबाबत ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता.

परळीतील केंद्रातून वीजनिर्मिती बंद, मिळणारा रोजगारही पडला बंद

मंगळवारी आरोग्य विभागाचे अवर सचिव वि. पु. घोडके यांनी ८७ अधिकाऱ्यांच्या बढतीचे शासनादेश निर्गमित केले. आरोग्य विभागात वर्ग-एक अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशा महत्त्वाच्या संवर्गाची ७० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांना सरकारची उदासीनता आणि महत्त्वाच्या खुर्च्यांवर सोयीच्या ठिकाणी बसलेले झारीतल्या शुक्राचार्यांचा पदोन्नत्यांना अडथळा हे मुख्य कारण आहे.

वर्षानुवर्षे पदोन्नत्या न केल्यामुळे पुढील संवर्गातील रिक्त पदांचा आजार अधिक दुर्धर होत आहे. आता कोरोनाच्या काळात तरी सरकार काही पावले उचलत नसल्याने ‘सकाळ’ने हा विषय लावून धरला. त्याचबरोबर यामुळे होणारे परिणाम आणि उपायही सुचविले. पदोन्नत्या झाल्यानंतर मूळ पदाचा अधिकारी येऊन आपली सोयीची खुर्ची जाईल, या भीतीमुळे या प्रभारींकडूच पदोन्नतीस आडकाठी येत होती. आता वर्ग-एक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या झाल्या असल्या तरी जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गाची पदोन्नत्यांतून भरली जाणारी पदेही तत्काळ भरण्याची गरज आहे.

बीड जिल्ह्यात आठ पदांचे अधीक्षक
बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही रिक्त पदांमुळे ऑक्सिजनवर आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी पदांवर प्रभारीराज आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक ही दोन पदे वगळता जिल्हा रुग्णालयातच प्रभारीराज आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) हे प्रमुख पदही रिक्त आहे. प्रशासकीय अधिकारी पदाचाही पदभार असून सदर पदही रिक्तच आहे. शल्यचिकित्सक, भीषक, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोग, मानसोपचार, रेडिओलॉजी या विभागांचे पदभारही प्रभारीच असून कान-नाक-घसा विभाग तर रिताच आहे. जिल्ह्यातील बहुतांश उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक पदांचे पदभारही प्रभारींच्याच खांद्यावर होते.

मात्र, आता वैद्यकीय अधिकारी वर्ग-एक पदांवरून जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गात बढत्यांमध्ये जिल्ह्यातील सात अधिकाऱ्यांना स्थान भेटले. यासह बाहेर जिल्ह्यातून एक असे जिल्ह्यातील आठ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांना पदांचे अधीक्षक भेटले आहेत. यामध्ये डॉ. महादेव चिंचोले (उपजिल्हा रुग्णालय, गेवराई), डॉ. संजय राऊत (उपजिल्हा रुग्णालय, केज), डॉ. चंद्रकांत चव्हाण (वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्र, लोखंडी सावरगाव), डॉ. अरुणा केंद्रे-दहिफळे (स्त्री रुग्णालय, लोखंडी सावरगाव), डॉ. सदाशिव राऊत (ग्रामीण रुग्णालय, पाटोदा), डॉ. संतोष शहाणे (ग्रामीण रुग्णालय, रायमोहा), डॉ. राहुल टेकाडे (ग्रामीण रुग्णालय, आष्टी) तर ठाणे येथून डॉ. अशिलाक शिंदे यांची नेकनूरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली.

संपादन - गणेश पिटेकर