मिनिटात ईसीजी, दहा सेकंदात अहवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ECG report treatment ET Cardioplot 12 device

मिनिटात ईसीजी, दहा सेकंदात अहवाल

औरंगाबाद : हृदयविकाराच्या रुग्णांसाठी तातडीने ईसीजी रिपोर्ट मिळावा म्हणून येथील तन्वी निकाळजे, प्रतीक तोडकर आणि मिहीर गायकवाड यांनी इन्थुंटेक प्रा. लि. स्टार्टअपच्या माध्यमातून ‘ईटी कार्डिओप्लॉट १२’ या उपकरणाची निर्मिती केली आहे. हे उपकरण वीजपुरवठ्याशिवाय मोबाईल बॅटरीच्या आधारे केवळ एका मिनिटात ईसीजी आणि दहा सेकंदात त्याचा रिपोर्ट पीडीएफ स्वरूपात तयार करते. हा रिपोर्ट तत्काळ कुठेही पाठवता येऊ शकतो.

पारंपरिक ईसीजीसाठी वीजपुरवठ्याची गरज असते. त्यानंतर प्रशिक्षित मनुष्यबळाद्वारे चाचणीसाठी किमान १५ ते ५० मिनिटे लागतात. चाचणीच्या (रिपोर्ट) विश्‍लेषणासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असणे आवश्यक असते किंवा प्रिंट केलेला रिपोर्टची फोटोकॉपी संबंधित डॉक्टरांना पाठवावा लागते. शहरी भागात या सुविधा जलद मिळू शकतात; पण ग्रामीण भागात हृदयरोगतज्ज्ञांसह अन्य तांत्रिक बाबींच्या तज्ज्ञांची कमतरता आहे. सहजपणे कुठेही, केव्हीही ईसीजी काढता यावा, या उद्देशाने हे उपकरण तयार करण्यात आले आहे.

पारंपरिक ईसीजी मशीन तुलनेत मोठे असते. प्रिंट काढावी लागते. ती तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासल्यानंतर हृदयरोगाच्या रुग्णांवर उपचार सुरू केले जातात. यासाठी वेळ जातो. कमी वेळेत ईसीजी काढून रुग्णावर पुढील उपचार सुरू व्हावेत, हाही या उपक्रमामागचा उद्देश आहे.

वर्षभर केले संशोधन

येथील तन्वी निकाळजे एमबीबीएस, प्रतीक तोडकर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर तर मिहीर गायकवाड हा एमबीए अंतिम वर्षात आहे. या तिघांनी वर्षभर एकत्रित संशोधन करून एका मिनिटात ईसीजी, दहा सेकंदांत रिपोर्ट पाठविणाऱ्या ‘ईटी कार्डिओप्लॉट १२’ या उपकरणाची निर्मिती केली आहे. १ ऑगस्ट २०२१ ला हे उपकरण अधिकृतपणे बाजारात आणले.

मोबाईल बॅटरीचा वापर

‘ईटी कार्डिओप्लॉट १२’ या उपकरणाला वीजपुरवठ्याची गरज नाही. मोबाईलच्या बॅटरीद्वारे प्रक्रिया होते. उपकरण मोबाईलला जोडण्यासाठी छोटी केबल आहे. मोबाईलला जोडताच उपकरण सुरू होते. दुसऱ्या बाजूला ईसीजी काढण्यासाठी बारा लीड कनेक्ट करण्याची सुविधा आहे. उपकरणाचे १२ लीड छातीच्या भागाला लावताच दहा सेकंदांत ईसीजी रिपोर्ट रेकॉर्ड होतो. यासाठी तयार केलेल्या ‘ईटी कार्डिओप्लॉट १२’ या अॅपद्वारे ईसीजी रिपोर्ट पीडीएफ स्वरूपात कुठेही पाठवून बघता येतो. प्रिंटही काढता येते.

कुणालाही वापरणे सहज शक्य

‘ईटी कार्डिओप्लॉट १२’ हे उपकरण हॉस्पिटल, दवाखाने, आरोग्य केंद्र, घर, ऑफिस, रेल्वे, बस, रुग्णवाहिका, केअर सेंटर अशा कोणत्याही ठिकाणी वापरण्यासाठी सोपे आहे. काही दिवसांच्या प्रशिक्षणानंतर कोणतीही व्यक्ती ही चाचणी करू शकते. उपकरणात पोर्टेबल हॅण्ड डिव्हाईस असून त्यात बॅटरी नाही. कोणत्याही ॲन्ड्राईड मोबाईल, टॅबलेटला ते जोडता येते. उपकरणाद्वारे कितीही ईसीजी काढता येतात. रुग्णाच्या ईसीजीचे रेकॉर्डही ठेवता येते. हे उपकरण खरेदी केलेल्यांना प्रोफाईल क्रिएट करून दिली जाते. त्यात नाव, जन्म दिनांक, वय, मोबाईल क्रमांक आदी नोंदी असतात. उपकरण मोबाईलप्रमाणे छोटे असल्याने ते कुठेही नेता येते.

भविष्यातील योजना

‘कार्डिओप्लॉट १२’ या उपकरणाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहील अशी आहे. उपकरण खरेदी करणे अशक्य असल्यास ठराविक रक्कम देऊन संबंधित ते घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. यात संबंधितांना प्रत्येक ईसीजीवर ठराविक रक्कम द्यावी लागेल, असे सब्सक्रिप्शन मॉडेल आणले जाणार आहे. भविष्यात या माध्यमातून टेली मेडिसीनची सुविधा दिली जाणार आहे.