‘पॅझिटिव्ह’ रुग्ण सापडताच ‘वॉरियर्स’ सुट्टीवर ! 

कृष्णा पिंगळे
शनिवार, 23 मे 2020

कोरोनाच्या या लढ्यात डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना कोरोना वॉरियर्स (योद्धे) म्हणून ओळखले जातात. एकिकडे राज्यासह देशभरात जीव धोक्यात घालून कोरोना बाधितांची डॉक्टर, परिचारिका हे अहोरात्र सेवा करत आहेत. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात मात्र, कोरोनाबाधित रुग्ण आढळताच डॉक्टर व इतर कर्मचारी रजेवर गेले आहेत. याप्रकाराचा नागरिकामधून संताप व्यक्त होत आहे.

सोनपेठ (जि.परभणी) : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात आठ रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा आल्यानंतर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचारी हे कोरोना ‘वॉरियर्स’ (योद्धे) रजेवर गेले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीस कोविडचा दर्जा देऊन तिथे एका वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह दोन डॉक्टर तसेच आरोग्य सेविका अशा मोजक्याच कर्मचाऱ्यांवर याचा भार टाकण्यात आला होता. दोन महिने सुरू असणाऱ्या या कोविड १९ सेंटरमध्ये ता. १५ रोजी सोनपेठ शहरात अनधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्या नऊ जणांमधील आठ जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर हालगे वगळता बाकी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातून काढता पाय घेतला आहे. या ठिकाणी सेवा देत असलेल्या खासगी सहायकांशिवाय इतर कुठलाही अधिकृत आरोग्य कर्मचारी या ठिकाणी सध्या उपलब्ध नाही. 

हेही वाचा व पहा : व्वा!  नवरा इकडे, नवरी तिकडे तरीही झाले लग्न, पाहा

कर्मचाऱ्यांची दमछाक

कोरोना बाधित रुग्णांच्या प्रथम संपर्कात असणारे अंदाजे ८० ते ८५ नागरिक हे निगराणीखाली ठेवण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने चालू आहे. मात्र, हे काम करण्यासाठी सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्याच कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागात काम करणाऱ्या इतर विभागातील कर्मचारी आणि स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांत कुठलीही सुसूत्रता व नियोजनाचा मोठा अभाव आढळून येत आहे. या सर्व कामात सोनपेठ शहर व ग्रामीण भागातील नागरिक मात्र, कोरोनामुळे चांगलेच भयभीत झाल्याचे चित्र आहे. सध्या कार्यरत असणारे आरोग्य विभागाचे अधिकारी मात्र एकीकडे तालुक्यातील आपले हितसंबंध जोपासणे आणि जिल्ह्यावरील अधिकाऱ्यांकडे कर्मचारी आणि आवश्यक यंत्रसामुग्रीची मागणी करणे याशिवाय दुसरे काहीही करत नसल्याची धक्कादायक माहीती समोर येत आहे.. 

हेही वाचा : Corona Breaking : परभणी जिल्ह्यात आज पुन्हा दोन पाॅझिटिव्ह, रुग्ण संख्या २२ वर
 

वारंवार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मागणी
सोनपेठ तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण निघाले असतांना तालुक्यात मात्र प्रशासकीय नियोजन व समन्वय मात्र, पहावयास मिळत नाही. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सोनपेठ तालुक्यात म्हणावी तेवढी यंत्रणा दिलेली नाही. मात्र आहेत त्याच तोकड्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामाचा ताण मात्र, वरिष्ठ वाढवत असल्याची चर्चा सध्या होत आहे. सोनपेठ येथे चालू करण्यात आलेल्या कोविड केंद्रालाच ग्रामीण रुग्णालय समजून कुठलीही सुविधा न पुरविणारे जिल्हा प्रशासन आहेत त्याच तोकड्या आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच परीक्षा घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सोनपेठ कडे विशेष लक्ष देऊन सक्षम अधिकारी आणि उपयुक्त असे यंत्रसामग्री पुरविण्याची मागणी जनतेतून होत आहे. 
 

वरिष्ठांकडे मनुष्यबळाची मागणी 
सोनपेठ येथील कोविड १९ सेंटरसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि शालेय आरोग्य विभागात कार्यरत असणारे डॉक्टर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. परंतु काही डॉक्टर हे तालुक्यातील चेक पोस्टवर सेवा देत असून काही कर्मचारी हे आजारी असल्याच्या कारणावरून सुट्टी घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे सध्या कोविड सेंटरवर अपुरे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर काम करावे लागत आहे. याबाबत जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना आम्ही लेखी पत्र देऊन वारंवार मागणी देखील करण्यात आलेली आहे.
- डॉ. सिद्धेश्वर हालगे, वैद्यकीय अधीक्षक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health workers on leave as soon as 'positive' patients are found! Parbhani News