Corona Breaking : परभणी जिल्ह्यात आज पुन्हा दोन पाॅझिटिव्ह, रुग्ण संख्या २२ वर

गणेश पांडे
Saturday, 23 May 2020

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (ता. २२ मे) रात्री शहरासह सावंगीचा प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह निघाल्याने रुग्णांची संख्या २२ वर गेली आहे.

परभणी :  जिल्ह्यात  शुक्रवारी  (ता. २२ मे) मध्यराञी प्राप्त अहवालानुसार आणखी नव्याने दोन रुग्ण आढळून आले. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ वर पोहचली आहे. त्यात परभणीचा एक व जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील एका रूग्णाचा समावेश आहे. परजिल्ह्यातील व्यक्तींसह कुटुंबियांच्या अधिकृतपणे-अनाधिकृतपणे प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूरपर्यंत पसरला आहे. विशेषतः या आठवड्यात प्रत्येक दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने परभणीकरांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

हेही वाचा व्वा!  नवरा इकडे, नवरी तिकडे तरीही झाले लग्न, पाहा VIDEO

गुरूवारी (ता.२१ मे) रात्रीच शहरातील दोन व ग्रामीण भागातील दोन असे चार संशयीत रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळले. त्याआधी बुधवारी (ता. २० मे) एकदम नऊ रुग्णांचे स्वॅब पॉझीटीव्ह आढळले होते. त्या आधीच्या दोन दिवसांत प्रत्येकी एक रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आला. त्यामुळे गुरूवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० होती. परंतू शुक्रवारी (ता. २२) रात्री त्यात आणखीन दोन रुग्णांची भर पडली.

विभागीय आयुक्त घेणार आज आढावा
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव परभणी जिल्ह्यात वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर हे शनिवारी (ता. २३ मे) जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. दौऱ्यात ते जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिका-यां बरोबर बैठकीद्वारे आढावा घेणार आहेत. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ वर पोचली आहे. विशेषतः परजिल्ह्यातील अधिकृत, अनाधिकृतपणे परतलेल्या व्यक्ती व कुटुंबियांचेच स्वॅब पॉझीटीव्ह आढळले आहेत. 

येथे क्लिक कराच - पायऱ्या, ओटे झाले बसण्यास पोरके...

तपशीलवार घेणार आढावा
भविष्यात सुध्दा यांच्या संपर्कातील काही व्यक्तींचे अहवाल देखील पॉझीटीव्ह येतील की काय? अशी भिती जिल्हा प्रशासनासह परभणीकरांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवरच विभागीय आयुक्त केंद्रेकर हे शनिवारी सकाळी परभणीत दाखल होत असून ते या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, शासकीय यंत्रणाद्वारे संयुक्तपणे केले जाणारे प्रयत्न याविषयी तपशीलवार आढावा घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking: Two More Patients In Parbhani District Today