esakal | परभणीत पूर्वमोसमी पावसाची जोरदार सलामी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे अल्हादायक वातावरण निर्माण झाल्याने उष्णतेपासून सुटका मिळाली आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळली असून झाडेदेखील अडवी झाली आहेत.

परभणीत पूर्वमोसमी पावसाची जोरदार सलामी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली असून रविवारी (ता. ३१) रात्री सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून मशागतीच्या अंतिम कामांना सोयीचे झाले आहे. एकूण १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाटेमुळे अंगावर जाळ फेकल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, दोन दिवसांत ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरले होते. रविवारी दिवसभर दमट स्थिती निर्माण झाल्याने उकाडा वाढला होता. सायंकाळी काही भागात पाऊस पडला. रात्री नऊच्या सुमारास परभणी शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाला सुरवात झाली. सोबतीला वादळी वारेदेखील होते.

हेही वाचा - परभणी जिल्ह्यात रविवारी दोघे पॉझिटिव्ह

पाथरी तालुक्यात तुफान पाऊस झाला. रात्री नऊ ते ११ या वेळेत जोरदार पाऊस झाल्याने पाथरी शहरातील रस्त्यावरून पाणी वाहत होते. तसेच शेतशिवारातदेखील काही वेळातच पाणी साचले. सेलु तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला. परभणी, पूर्णा, मानवत तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पालम, गंगाखेड, सोनपेठ तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जिंतूर तालुक्यातदेखील हलका पाऊस होता.

परभणीत पहाटेपर्यंत पाऊस
परभणी शहर आणि परिसरात रात्री उशीरा झालेला पाऊस पहाटे सात वाजेपर्यंत रिमझिम स्वरूपात सुरू राहिला. दिवसभर अल्हादायक वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यापासून सुटका मिळाली आहे.

झरीसह १९  गावे अंधारात
रविवारी सायंकाळी  वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झरी (ता. परभणी) शिवारात मोठे नुकसान केले आहे. वाऱ्यामुळे झरी गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. शेताआखाडेदेखील कोसळली आहेत. अनेक शेतकऱ्यांची चारा पिके आडवी झाली आहे. तसेच झरी ३३ केव्ही उपकेंद्राला परभणी येथून वीजपुरवठा करणारे खांब दोन ठिकाणी अडवे झाल्याने उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे झरीसह १९ गावे रविवारपासून अंधारात आहेत.

हे देखील वाचायलाच पाहिजे - जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर आता समितीचा ‘वॉच’

मशागतीच्या कामांना सुलभता
खरीप हंगामातील पेरणीसाठी पूर्वमशागत महत्त्वाची असते. त्यासाठी वळवाचा, अर्थात पूर्वमोसमी पाऊस झाल्यास अधिक सोयीचे ठरते. यंदा पूर्वमोसमी पाऊस जोरदार झाल्याने नांगरटी केलेल्या शेताची मशागत करण्यास सुलभता येणार आहे. त्यामुळे मशागत चांगली होणार आहे.

तालुकानिहाय पाऊस(मिलिमीटरमध्ये)
परभणी १४.१३, पालम १७, पूर्णा १७, गंगाखेड १७, सोनपेठ नऊ, सेलू १९.६०, पाथरी ४२.३३, जिंतूर ६.१३, मानवत १२.६७, एकूण १७.२१

येथे क्लिक कराच - Video - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय होणार?

मंडळनिहाय झालेला पाऊस
परभणी शहर दहा, परभणी ग्रामीण नऊ, सिंगणापूर १४, दैठणा २१, झरी २४, पेडगाव दहा, पिंगळी ४, जांब २१, पालम १२, चाटोरी २७, बनवस १२, पूर्णा १२, ताडकळस २२, चुडावा २८, लिमला १६, कातनेश्वर सात, गंगाखेड ३४, राणीसावरगाव आठ, माखणी १२, महातपुरी १४, सोनपेठ दहा, आवलगाव आठ, सेलू १३, देऊळगाव दहा, कुपटा २१, वालूर २७, चिकलठाणा २७, पाथरी ४५, बाभळगाव ४२, हादगाव ४०, जिंतूर ०.८०, सावंगी म्हाळसा पाच, बोरी आठ, चारठाणा सहा, आडगाव बु. ११, बामणी सहा, मानवत चार, केकरजवळा १२, कोल्हा २२.