अतिवृष्टीने नळदुर्ग किल्ल्याचे नुकसान, डागडुजीसाठी हवा निधी

भगवंत सुरवसे
Saturday, 21 November 2020

महिनाभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे भुईकोट किल्ल्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाणी महालावरील लोखंडी सुरक्षा रेलिंग वाहून गेले तर किल्ल्याची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) : महिनाभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे भुईकोट किल्ल्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाणी महालावरील लोखंडी सुरक्षा रेलिंग वाहून गेले तर किल्ल्याची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरातत्त्व खात्याच्या पथकाने पंधरा दिवसांपूर्वी किल्ल्यातील नुकसानीची पाहणी केली. मात्र, किल्ल्यातील डागडुजी व दुरुस्तीसाठी मदत निधीची प्रतीक्षा आहे.

२५ वर्षांत पहिल्यांदाच पाणी महालावरून तब्बल पाच ते सहा फुटावरून पाणी गेले. त्यामुळे वीस वर्षांपूर्वी १९९९ मध्ये पुरातत्त्व खात्याने बसवलेले लोखंडी पाइपचे सुरक्षा कठडे वाकडे झाले तर काही कठडे वाहून गेले. तसेच किल्ला करारान्वये दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने नर-मादी धबधब्याच्या खालच्या भागात दोन ठिकाणी बनवलेले छोटे बांधही वाहून गेले. युनिटी कंपनीने तीन वर्षांपूर्वी याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेली झाडे, शोभेची फुलझाडे, फळझाडेही वाहून गेल्यामुळे आर्थिक नुकसान झाले.

पाणी महालावरील लोखंडी पाइपचे कठडे पाण्याच्या वेगामुळे उखडून निघाल्याने याठिकाणी दिसत आहे. तसेच पाण्याबरोबर वाहून आलेली झाडेझुडपे या कठड्यात अडकली होती. युनिटी कंपनीने पाणी महालावर कारंजे बसवले होते तेही वाहून गेले आहेत. पुरातत्त्व खात्याचे सहसंचालक अजितकुमार खंदारे यांच्यासह अभियंता, वास्तुविशारद व तज्ज्ञ असलेल्या पथकाने किल्ल्यातील नुकसानीची पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर केल्याची माहिती सहसंचालक खंदारे यांनी ‘सकाळ’ला दिली.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain Damaged Naldurg Fort Osmanabad News