Success Story : रिक्षाचालकाच्या मुलाने जिद्दीतून मिळविले यश, तांड्यावरचा पोरगा होणार डॉक्टर

अविनाश काळे
Saturday, 21 November 2020

परिस्थिती कधीही हलाखीची असली तरी त्यातून मार्ग काढण्याची जिद्द असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. हेच तालुक्यातील मुळजतांडा येथील रोहन राजू जाधव याने दाखवून दिले. नुकत्याच घेण्यात आलेल्या नीटच्या वैद्यकीय परीक्षेत रोहनने ५४४ गुण घेऊन यश संपादन केले.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : परिस्थिती कधीही हलाखीची असली तरी त्यातून मार्ग काढण्याची जिद्द असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. हेच तालुक्यातील मुळजतांडा येथील रोहन राजू जाधव याने दाखवून दिले. नुकत्याच घेण्यात आलेल्या नीटच्या वैद्यकीय परीक्षेत रोहनने ५४४ गुण घेऊन यश संपादन केले. रोहनच्या घरची परिस्थिती बेताची आहे. वडील रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत रोहनने हे यश संपादित केले. त्याचा लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे.

 

रोहनचे वडील राजू जाधव यांना आपला मुलगा डॉक्टर व्हावा अशी इच्छा होती. त्या दिशेने त्याने रोहनला प्रोत्साहित केले. रोहनचे दहावीपर्यंतचे शिक्षण शहरातील भारत विद्यालयात झाले. आर्थिक परिस्थिती हालकीची असल्याने पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठविता आले नाही. रोहनने अकरावी व बारावीचे शिक्षण शहरातील शिवाजी महाविद्यालयात घेतले. पहिल्या प्रयत्नात रोहनला यश मिळाले नाही. वैद्यकीय शिक्षणाच्या पूर्व तयारीच्या शिकवणीसाठी पैसे नव्हते. तेव्हा पुणे येथील एलएफयू या सामाजिक संस्थेशी वडील राजू यांनी संपर्क केला.

या संस्थेने रोहनच्या वैद्यकीय प्रवेशाच्या पूर्व तयारीच्या शिक्षण मोफत दिले. रोहनने परिस्थितीवर मात करून अभ्यास केला आणि मेहनतीला यश मिळाले. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोहनला प्रवेश मिळाला आहे. रोहनच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील मायक्रोकॉम कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने शुक्रवारी (ता. २०) सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक प्रा. युसूफ मुल्ला, अॅड. मल्हारी बनसोडे, रोटरीचे सचिव अनिल मदनसुरे, ॲड. एस. पी. इनामदार, ॲड. फिरोज मुल्ला, धीरज बेळंबकर आदी उपस्थित होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Autorikshaw Driver Son To Be Doctor, He Cleared Neet Entrance Umarga