Parbhani : परभणीत वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस

जनजीवन विस्कळित, वाहतूकही ठप्प, पिकांचे प्रचंड नुकसान
Parbhani
Parbhanisakal
Summary

जनजीवन विस्कळित, वाहतूकही ठप्प, पिकांचे प्रचंड नुकसान

परभणी : शहरासह परिसरात शुक्रवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तब्बल दीड- दोन तास पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांचे नदीत तर रस्त्यावरील खड्ड्यांचे तलावात रूपांतर झाले होते. अनेक रस्त्यांवरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

परतीच्या पावसाने जिल्ह्याला मोठा झटका दिला असून, ऑक्टोबरच्या मध्यावर देखील सर्वदूर जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. उभी पिके खरडून गेली तर कुठे पाण्याखाली. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत आकाश निरभ्र होते.

पावसाची शक्यताही वाटत नव्हती. परंतु, दुपारी दोननंतर अचानकच वातावरण बदलले. आभाळ भरून आले. ढगांचा गडगडाट सुरु झाला. विजाही चमकू लागल्या व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन ते अडीच तास वादळी वाऱ्यासह संततधार सुरू असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता.

या पावसामुळे वसमत रस्त्यासह, शहरातील प्रमुख रस्ते, गावठाणातील रस्ते, वसाहतीत रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. जिंतूररोड ते नानलपेठ, अपना कॉर्नर, वांगी रोड, धार रोड, मोठा मारुती ते उघडा महादेव आदी रस्त्यांनाही तलावाचे स्वरूप आले होते. तसेच सखल भागातील अनेक वसाहतीतील घरांमध्ये पाणी शिरले होते.

सलग सहाव्या दिवशीही हिंगोली जिल्ह्यात हजेरी

हिंगोली : जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही शुक्रवारी (ता. १४) पावसाने हजेरी लावली. सेनगाव, वसमत शहरासह तालुक्यातील काही गावांत पाऊस झाला. जिल्ह्यात मागील २४ तासांत ८.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत झालेला पाऊस तालुकानिहाय पुढीलप्रमाणे हिंगोली १२ मिलिमीटर, कळमनुरी ११, वसमत ३.४०, औंढा नागनाथ ४.४०, सेनगाव ११ तर एकूण ८.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी वसमत शहरासह तालुक्यातील गिरगाव, परजना, खाजमापूर वाडी, सोमठाणा, बोरगाव खुर्द, पार्डी बुद्रूक, डिग्रस खुर्द आदी भागात पाऊस झाला. या पावसामुळे वेचणीस आलेल्या कापूस तसेच सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला.

दिवसाच काळा कुट्ट अंधार

पूर्णा : तालुक्यात शुक्रवारी दुपारनंतर सर्वदूर परतीचा पाऊस वादळी वाऱ्यासह पडला. अनेक ठिकाणी काढणी केलेल्या सोयाबिनचे पीक जमा करणे झाले नाही. तर, ज्या ठिकाणी काढणी केलेल्या सोयाबीनचे छोटे- छोटे ढिगारे लावलेले होते, ते जोरदार पावसामुळे वाहून जाताना आढळून आले.

शुक्रवारी झालेला पाऊस पावसाळ्यातील मोठा, जोरदार पाऊस पहिलाच असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात ओढ्याला- नदीला पूर आल्याने शेतात गेलेल्या अनेकांचा गावाकडे येण्याचा मार्ग बंद झाला होता. काळेकुट्ट ढग आलेले असल्याने दिवसाच अंधार पडल्यागत वाटत होते. पूर्णा शहरात सर्व रस्ते पाण्याने तुडुंब भरून वाहत होते. अनेक दुकानांत पानी शिरले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com