परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

परभणी शहरासह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. त्याचा परिणाम, सखल भागातील वस्त्यांमधून घरोघरी पाणी घुसले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. काही भागात रस्ते जलमय, तर मैदानांना अक्षरक्षः तळ्याचे स्वरूप आले.

परभणी : परभणी शहरासह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. त्याचा परिणाम, सखल भागातील वस्त्यांमधून घरोघरी पाणी घुसले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. काही भागात रस्ते जलमय, तर मैदानांना अक्षरक्षः तळ्याचे स्वरूप आले.

मध्यवस्तीतील काद्राबाद प्लॉट, नांदखेडा रस्त्यावरील बेलेश्‍वरनगर, सेवक नगर तसेच जिंतूर रस्त्यावरील जुना पेडगावरोड, त्रिमूर्तीनगर, साखला प्लॉट, परसावतनगर तसेच धार रस्त्यासह वांगी रस्त्यावरील अनेक वसाहतींसह झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर घराघरांमधून पाणी घुसले. या पाण्यामुळे अनेक घरांतील संसारोपयोगी साहित्य अक्षरक्षः पाण्यात तरंगू लागले. नाल्याचे पाणी घरात घुसल्याने घरांसह वस्त्यांमधून दुर्गंधी पसरली. रात्री उशिरापर्यंत सर्वसामान्य या पावसाच्या धास्तीने तसेच पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता अक्षरक्षः त्रस्त झाले होते.

हेही वाचा  व पहा :  व्हिडीओ : पेरणीसाठी पती-पत्नीने ओढले सरते !

अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस
दरम्यान, शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अर्धा तास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. जून महिन्यात १४५.३० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना १७९.९७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीशी हे प्रमाण २१.५ मिलिमीटर आहे. तर जून महिन्यातील या पावसाची टक्केवारी १२३ मिलिमीटर इतकी आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आठ दिवसांपासून दररोजच सायंकाळी हलक्या स्वरूपात पाऊस हजेरी लावू लागला आहे. तीन दिवसांपूर्वी पाथरी व सेलू तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. शहरासह परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस सुुरूच होता. सोमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तीन मिलिमीटरची नोंद केली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचे आगमन झाले. या पावसाने जून महिन्यातील अपेक्षेपेक्षा जास्त पावसाची नोंद केली आहे.

 हेही वाचा : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे

वालूरला मुसळधार पाऊस...
सेलू  :  वालूर (ता. सेलू) व परिसरात दुपारी साडेचारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
सेलू तालुक्यातील वालूर परिसरात सोमवारी (ता.२९) दिवसभर दिलेल्या खंडानंतर मंगळवारी (ता. ३०) पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून शुक्रवार (ता.२६) ते रविवार (ता. २८) हे तीन दिवस या परिसरात जोरदार पाऊस झाला. सोमवारी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. ३०) या भागात जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र रस्त्यावरून पाणीच पाणी वाहत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in the district including Parbhani city Parbhani News