मुसळधार पावसाचा पूलाला फटका, संपर्क तुटला, कुठे ते वाचा... 

pull
pull

हिंगोली ः तालुक्यात गुरुवारी (ता.२५) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने वसईकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या मोतनाई नदीला पूर आला. या नदीवर असलेला नळकांडी पूल त्‍यामुळे वाहून गेल्याने जवळपास २५ गावांचा संपर्क तुटला असून कळमनुरीमार्गे नांदेडकडे जाणारी वाहतूक व दळणवळण सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.

हिंगोलीहून समगा -दुर्गधामनी वसई मार्गे कळमनुरी, नांदेडकडे जाण्यासाठी हा मधला सोयीचा रस्ता असल्याने या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोयीचे होते. हे अंतर देखील कमी असल्याने परिसरातील नागरिक पर्याय म्हणून याच रस्त्याचा नेहमीच वापर करतात. २५ वर्षापुर्वी या पुलाची उभारणी करण्यात आल्याचे गावकरी सांगत आहेत.

पुलाच्या बाजूची माती खचल्यावरही दुर्लक्ष 
मृग नक्षत्रात झालेल्या पावसाने या पुलाच्या बाजूची माती खचली होती. मात्र, याकडे सार्वजनिक विभागाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रात्री सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वसई व दुर्गधामनी पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने नदी, ओढे तुडुंब भरून वाहू लागले होते.
त्यातच वसई येथील नळकांडी पुलावरून चार फूट पाणी वाहू लागल्याने नळकांडी पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. त्यामुळे आता या मार्गावरील दळणवळण सेवा, वाहतूक सेवा ठप्प झाली असून सुमारे वीस ते पंचवीस गावांचा संपर्क तुटला.

वीस ते पंचवीस वर्षापुर्वी बांधला पूल
दुर्गधामनी ते वसई या दोन गावांमधील जोडणारा पूल हा मागील वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी नांदेड येथील गुत्तेदाराने सार्वजनिक विभागामार्फत काम केल्याचे जाणकार नागरिकांनी सांगितले. परंतु, पावसाळ्यापूर्वी गावांना जोडणाऱ्या पुलाची पाहणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली पाहिजे, नळकांडी पुलातील कचरा गोळा करून साफसफाई करणे महत्वाचे असताना संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा पूल वाहून गेला.

दोन वर्षापुर्वी घडला होता प्रकार  
मागील दोन वर्षापुर्वी समगा येथील नळकांडी पूल वाहून गेला होता. पुन्हा थातूरमातूर डागडुजी करून हा पूल सुरळित केला आहे. त्यामुळे अंतर्गत गावांना जोडणाऱ्या पुलाची पाहणी करून आताच दुरुस्ती केली तर पुढे होणाऱ्या घटना टाळता येतील. याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या नळकांडी पुलाची पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी समगा येथील पंजाब सरकटे यांनी केली आहे.

या गावांचा संपर्क तुटला
मोतनाई नदीवरील पूल वाहून गेल्याने समगा ,दुर्गधामनी, वसई, येडुत ,पूर, राजदरी, जामगव्हाण, टाकळगव्हाण, टेंभुरदरा, आमदरी, बोल्‍डा, कंजारा, बाळापूर, नांदापूर आदी वीस गावांचा संपर्क तुटला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रकाश वायचाळकर यांच्याशी संपर्क केला ते सुट्टीवर असल्याचे समजले. मात्र, प्रभारी कार्यकारी अभियंता यांच्याशी देखील याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

गोरेगाव येथे अतिवृष्टी
गोरेगाव ः सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव येथे रात्री अतिवृष्टी झाली. येथे ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे पेरलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली होती. त्‍यांची पिके या पाण्याने वाहून गेले. अनेक शेतात पावसाचे पाणी जमा झाल्याने शेताला तळ्याचे स्‍वरुप आले होते. लागवड केलेली हळद बेडसह वाहुन गेली, ठिबक संचही वाहुन गेले. सर्व लहान मोठे बंधारे फुटल्याने शेताचे तळे झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अप्पर तहसिलदार भालेराव यांना याबाबत माहिती देण्यात आली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com