Video: कंधार तालुक्यात गारांचा पाऊस

धोंडीबा बोरगावे
सोमवार, 6 एप्रिल 2020

गेली काही दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीने भयभीत होऊन लॉकडाउनमुळे परेशान झालेला जनमाणूस हाताला काम नसल्याने बेजार असलेला बेरोजगार या विस्कळित झालेल्या जनजीवनाला पार वैतागला असतानाच आज अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरीही हवालदिल झाला आहे.

फुलवळ, (ता.कंधार, जि.नांदेड) : कंधार तालुक्यातील फुलवळसह परिसरात सोमवारी (ता. सहा) सायंकाळी पावणे पाच वाजल्यापासून तब्बल अर्धा तास सोसाट्याचा वारा, विजांचा गडगडाट आणि गारांचा पाऊस पडला, त्यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेली काही दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीने भयभीत होऊन लॉकडाउनमुळे परेशान झालेला जनमाणूस हाताला काम नसल्याने बेजार असलेला बेरोजगार या विस्कळित झालेल्या जनजीवनाला पार वैतागला असतानाच आज अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरीही हवालदिल झाला आहे. सध्याच्या स्थितीला बहुतांश ठिकाणी गहू कापणी, हळद काढणी, हरभरा काढणे चालू असून शिजवलेल्या हळदीचेही बरेच नुकसान झाले, तर बऱ्याच ठिकाणी उन्हाळी भुईमूग, ज्वारी या उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेला पाऊस आणि त्यातच गारांचा सडा पाहून २०१२ साली झालेल्या गारपिटीची आठवण झाली. त्या वेळीही असेच अचानक आलेल्या पावसात आणि गारपिटीत मोठे नुकसान झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती आज पाहायला मिळाली. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ महसूल विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करावेत आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊन मोबदला द्यावा, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
हेही वाचा -निसर्गाच्या सान्निध्यात बांधल्या रेशीमगाठी !
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा जखमी

नायगाव तालुक्यात वादळी वारा व विजेचा कडकडाट होत असल्याने शेतातील बैल झाडाखाली बांधताना वीज पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर शेतकऱ्याचा तेरा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तसेच याच ठिकाणी बैल दगावल्याची घटना सोमवारी (ता.सहा) सायंकाळी पाचच्या दरम्यान मांजरम येथे घडली. जखमी मुलास उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले तर मयत मारोती व्यंकटराव शिंदे यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी नायगाव रुग्णालयात नेण्यात आले.
मांजरम येथील शेतकरी मारोती व्यंकटराव शिंदे (वय ४२) हे मुलांच्या शिक्षणासाठी नांदेड येथे राहत होते. पण, ‘कोरोना’च्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते सहकुटूंब गावाकडे आले होते. सोमवारी काही कामानिमित्त नायगाव येथे आल्यानंतर दुपारी परत गावाकडे गेले. सायंकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झाले त्यातच पावसाची शक्यता होती. सोमवारी शेतात सालगडी नसल्याने आपल्या लहान मुलाला घेवून मारोती शिंदे शेताकडे गेले होते. तेवढ्यात वादळी वारा व तुरळक पावसाच्या सरी आणि विजेचा गडगडाट होत असल्याने शेतात उघड्यावर असलेले बैल झाडाखाली बांधण्यासाठी दोघे बाप लेक चालले असताना वीज पडली. यात मांजरम येथील तरुण शेतकरी मारोती व्यंकटराव शिंदे (वय ४२) व एक बैल जागीच ठार झाले तर मुलगा कृष्णा मारोती शिंदे (वय १३) हा गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी शेतात धाव घेवून जखमी कृष्णाला पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले तर मयत शिंदे यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Kandahar taluka,nanded news