निसर्गाच्या सान्निध्यात बांधल्या रेशीमगाठी !

जगदीश जोगदंड
सोमवार, 6 एप्रिल 2020

पांगरा ढोणे (ता. पूर्णा, जि.परभणी) येथील द्वारका गंगाधर ढोणे असे वधूचे नाव असून वर आहेरवाडी येथील अंकुश ज्ञानदेव खंदारे यांचा विवाह रविवारी (ता. पाच) सामाजिक कार्यकर्ते तुकाराम ढोणे यांच्या शेतात पार पडला.

पूर्णा (जि. परभणी) : लग्न म्हटलं की, बडेजावपणाचा सोहळा, थाटमाट आलाच. परंतु, कोरोनाच्या साथीमुळे शेतातच सात-आठ जणांच्या उपस्थितीत व  वृक्षवल्ली, पशू - पक्ष्यांच्या साक्षीने पांगरा ढोणे (ता. पूर्णा) येथील शेतात रविवारी (ता. पाच) अनोखा विवाह सोहळा पार पडला.

पांगरा ढोणे (ता. पूर्णा) येथील द्वारका गंगाधर ढोणे असे वधूचे नाव असून वर आहेरवाडी येथील अंकुश ज्ञानदेव खंदारे यांचा विवाह रविवारी (ता. पाच) सामाजिक कार्यकर्ते तुकाराम ढोणे यांच्या शेतात पार पडला. या वेळी वधू - वरांचे आई-वडील, लग्न लावणारे जंगम व तुकाराम ढोणे इतकेच लग्नाला उपस्थित होते.

हेही वाचा - विविध सेवाभावी संस्था ठरल्या देवदूत ....

संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा दिला दाखला

या वेळी एक मीटर सुरक्षित अंतर व तोंडावर मास्क लावण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले. त्यासाठी वर्तुळ आखण्यात आले होते. सोयरिक झालेली लग्नाची तारीखही काढण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या साथीमुळे अनेक लग्न सोहळे रद्द झाले. हेही लग्न पुढे ढकलण्यात येणार होते. याची माहिती गावातीलच सामाजिक कार्यकर्ते तुकाराम ढोणे यांना समजताच त्यांनी दोन्ही परिवारांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. लग्नाला वऱ्हाडी येऊ शकणार नाहीत. हा मुद्दा पुढे आल्यावर त्यांनी संत तुकाराम महाराज यांचा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी’, या अभंगाचा दाखला दिला व हे सर्व वऱ्हाडी समजावेत, असे पटवून दिले अन् लग्नाचा मार्ग सुखकर झाला. अगदी फक्त जन्मदात्यांच्या उपस्थितीत हा अनोखा विवाह सोहळा निसर्गाच्या सान्निध्यात शेतात पार पडला. या अनोख्या विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे. आहेरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश खंदारे यांनी दोन्ही परिवारांचे कौतुक केले व हा आदर्श सर्वांनी घेत लग्न समारंभातील वायफळ खर्च टाळावा, असे आवाहन केले.

हेही वाचा - रक्त संकलनासाठी आमदाराचा पुढाकार

 शेतातच मुलीचे कन्यादान...
वर-वधूचे प्रत्येकी पाच- पाच सदस्यांच्या उपस्थितीत लग्न लावण्याचा पांगरा ढोणे येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम ढोणे यांचा स्तुत्य उपक्रम.
.....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wedding Ceremonies Surrounded by Nature!,parbhani news