esakal | परभणीकरांच्या मदतीला ‘माझी हेल्थ, माझ्या हाती’ ॲप, कसे ते वाचाच... 
sakal

बोलून बातमी शोधा

app

जिल्हा प्रशासनाने ‘माझी हेल्थ माझ्या हाती’, हे मोबाइल ॲप कार्यान्वित केले असून महापालिकेने या ॲपचा वापर करून शहरातील नागरिकांची माहिती संकलीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

परभणीकरांच्या मदतीला ‘माझी हेल्थ, माझ्या हाती’ ॲप, कसे ते वाचाच... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी ः जिल्हा प्रशासनाने ‘माझी हेल्थ माझ्या हाती’, हे मोबाइल ॲप कार्यान्वित केले असून महापालिकेने या ॲपचा वापर करून शहरातील नागरिकांची माहिती संकलीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या ॲपवर माहिती भरल्यानंतर सदरील व्यक्ती कोरोना संशयीत आहे की नाही हे अवघ्या पाच मिनीटात समजणार तर आहेच. परंतू, त्याचबरोबर तत्काळ उपचार सुरु होणार असल्यामुळे कोरोनाच्या प्रचाराला तसेच मृत्यूला देखील ब्रेक लागणार आहे. 

औरंगाबाद येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. नागेश डोंगरे यांनी ई-कट्टाच्या माध्यमातून ‘माझी हेल्थ माझ्या हाती’ (एमएचएमएच) हे ॲप विकसित केले असून औरंगाबाद, नाशिक महापालिकेने त्याचा वापर देखील सुरु केला असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. 

प्रा. नागेश डोंगरे यांनी शिक्षकांना दिले प्रशिक्षण
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.सात) प्रा. नागेश डोंगरे यांनी या ॲपबद्दलची माहिती व त्याचे परिणाम सांगून प्रात्यक्षिक सादर केले. तसेच या वेळी काही शिक्षकांना त्याचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, महापालिकेचे आयुक्त देविदास पवार, पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. याच बैठकीत जिल्हा प्रशासनासह महापालिकेने हे ॲप कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला व अंमलबजावणीस देखील सुरुवात केली आहे. 

हेही वाचा - अन्नधान्य किट वाटपप्रकरणी राजकारण तापले, कुठे ते वाचा...

तीन दिवसात निदान शक्य - प्रा. डोंगरे
हे एक स्क्रीनिंग ॲप आहे. या ॲपमध्ये आपल्या शरीरातील ऑक्सीजनची पातळी, सर्दी, खोकला, ताप, रक्तदाब, मधुमेह, किडनी विकार या बद्दलची माहिती भरल्यानंतर त्या माहितीच्या आधारे तत्काळ त्या व्यक्तीची ग्रीन झोन (सुरक्षित), ऑरेंज झोन (निरक्षणाखाली) व रेडझोन (बाधित) अशी विभागणी होती. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असली तरी ती व्यक्ती बाधित आहे की नाही, हे लक्षात येण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात. परंतू, या ॲपमुळे ते तीन दिवसात शक्य होणार आहे. त्यामुळे तत्काळ उपचार सुरु होऊ शकतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार व मृत्यू देखील रोखण्यास मदत होते, असे ॲपबद्दल प्रा. डोंगरे ‘सकाळ’ शी बोलतांना म्हणाले. 

हेही वाचा - कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेबाबत अभियान, कुठे ते वाचा...

महापालिका करणार दुबार सर्वेक्षण
आ ॲपवर नागरिकांना स्वतः देखील माहिती भरता येणार आहे. परंतू, त्यासाठी ऑक्सीमिटरची गरज राहणार आहे. ज्यांच्याकडे ती उपलब्ध आहे, ते ॲपवर माहिती भरू शकतात. ही माहिती महापालिकेत सुरु करण्यात आलेल्या ‘वॉररुम’ मध्ये संकलीत होणार आहे. तत्काळ त्या माहितीचे विश्लेषण केले जाणार असून उपचाराची गरज असलेल्यांवर पालिकेचा आरोग्य विभाग उपचार सुरु करणार आहे. महापालिकेने शहरात शिक्षकांच्या माध्यमातून दुबार सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मात्र हे ऑक्सीमिटर, थर्मलगन घेऊन प्रत्येक कुटूंबातील प्रत्येक सदस्यांची तपासणी केली जाणार असून ती माहिती या ॲपवर भरली जाणार आहे. 

नागेश डोंगरे बाल विद्या मंदिर प्रशालेचे माजी विद्यार्थी 
नागेश श्रीपाद डोंगरे हे परतूर (जि.जालना) येथील रहिवासी असून औरंगाबाद येथे अभियांत्रिकीचे प्राध्यापक व युवा संशोधक आहेत. परभणी शहरातील बाल विद्या मंदिर या प्रशालेचे ते माजी विद्यार्थी आहेत. या आधी सुद्धा त्यांनी नवनवीन व समाज उपयोगी संशोधन केलेले आहे. न्यूगोशियशन मॉडेल फॉर मल्टी एजंट सिस्टीम, लग्नपत्रिकेतुन झाडे निर्माण यासारखी त्यांची संशोधने जागतिक स्तरावर गाजली आहेत.

 

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image