
कर्जबाजारीपणा, आजाराला लागणारा मोठा खर्च, मुलीच्या लग्नाची चिंता अन् सततच्या आर्थिक अडचणीला कंटाळुन इस्मालवाडी (ता.देवणी) येथील अल्पभुधारक शेतकऱ्याने शेतीतच विषप्राशन करत मंगळवारी (ता.१७) आपली जीवनयात्रा संपवली.
देवणी (जि.लातूर) : कर्जबाजारीपणा, आजाराला लागणारा मोठा खर्च, मुलीच्या लग्नाची चिंता अन् सततच्या आर्थिक अडचणीला कंटाळुन इस्मालवाडी (ता.देवणी) येथील अल्पभुधारक शेतकऱ्याने शेतीतच विषप्राशन करत मंगळवारी (ता.१७) आपली जीवनयात्रा संपवली. इस्मालवाडी येथील गोविंद गणपत आंबुलगे- सुर्यवंशी (वय ५०) हे पुणे येथे हातगाड्यावर केळी विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यातच त्यांना कँसर या जीवघेण्या आजाराने ग्रासले. मुलीच्या लग्नासाठी जीवनभर राबुन साठवलेले चार लाख रुपये कॅन्सरच्या आॅपरेशनवर झाल्याने व शिल्लक काहीच नसल्याने मार्चमध्ये लॉकडाऊनच्या काळात ते गावाकडे आले.
बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्र ठार, पैठण तालूक्यातील आपेगाव शिवारात दहशत
मात्र आर्थिक विवंचनेने येथेही त्यांचा पाठ सोडलीच नाही. जुनमध्ये आपल्या साठ गुंठे जमिनीवर तीन वेळा सोयाबीनची पेरणी करावी लागली. शिवाय अतिपावसाने सोयाबीन पिक हातीच लागले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचणींचा डोंगर वाढतच होता. मुलगी रेणुका आंबुलगे (वय १९) हिच्या विवाहाची बोलणी सुरु होती. तीन ठिकाणचे पाहणे मुलगी पाहण्यासाठीही आलेले होते. मात्र हुंडा व विवाहाचा खर्च यासाठी आंबुलगे यांच्याकडे काहीच शिल्लक नव्हते. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी येत असलेल्या अडचणी, त्यातच त्यांचा आजार बळावल्याने पुन्हा कॅन्सरचे आॅपरेशन करण्याचे निदान डॉक्टरांना लावले होते. या सर्वच बाबीतून त्यांना आत्महत्त्येचे टोकाचे पाऊल उचलले. दोन दिवसांपूर्वी शेतीत तणनाशक प्राशन केल्यानंतर वलांडी उदगीर येथे उपचार करुन लातुर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, आई वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
मुलीच्या विवाहासाठी दानशुरपणाची गरज
इस्मालवाडी तालुक्यातील एक छोटे गाव. या गावातीलच उमदे व्यक्तिमत्त्व असलेल्या गोविंद आंबलुगे पुण्यात रोजीरोटी निमित्त स्थिरावलेला. गावातील कोणीही पुण्याला गेल्यानंतर पहिला मदतीचा अन् आपलकीचा हात गोविंद यांचाच असायचा आज त्यांचेच कुंटुब उघड्यावर आले आहे. मुलीचे लग्न, संसाराचा थांबलेला गाडा, दीड एकर माळरान शेतीतुन कुटुंबाची उदरनिवार्ह होणार तरी कसा हे आणि यासह अनेक प्रश्न आंबुलगे कुटुंबीयासमोर आवासुन उभारलेले आहेत. त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी अन् मुलगा अविनाश याच्या शिक्षणासाठी समाजातील दानशुरांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
संपादन - गणेश पिटेकर