शेतकऱ्यांना उच्चप्रती उगवण क्षमतेचे बियाणे उपलब्ध करा, पालकमंत्री देशमुख यांचे आदेश

विकास गाढवे
Friday, 24 April 2020

मागील खरीप हंगामात सोयाबीन व अन्य पिकांचे बियाणे उगवले नसल्याच्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. यंदा अशा तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांना उच्चप्रतीची उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांचा पुरवठा झाला पाहिजे. याबाबतचे काटेकोरपणे नियोजन कृषी विभागाने करावे, असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

लातूर  : मागील खरीप हंगामात सोयाबीन व अन्य पिकांचे बियाणे उगवले नसल्याच्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. यंदा अशा तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांना उच्चप्रतीची उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांचा पुरवठा झाला पाहिजे. याबाबतचे काटेकोरपणे नियोजन कृषी विभागाने करावे, असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (ता. २४) आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, कृषी सहसंचालक टी. एन. जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीनिवासुलू पुजारी, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील हे ऑनलाइन सहभागी झाले होते. श्री. देशमुख म्हणाले, की कृषी विभाग व ‘महाबीज’ने बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात.

अधिकाऱ्यांच्या खासगी कारवरशासनाचे फलक, उदगीरात गाड्यांची वर्दळ वाढली

जिल्ह्याला आवश्यक विविध प्रकारच्या खत, बी-बियाणे व सर्व कृषी निविष्ठांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी प्रयत्न करावेत. रब्बी हंगामासाठी पीकविमा कंपनी मिळालेली नव्हती. खरीप हंगामासाठी या प्रकाराच्या पुनरावृत्तीत होणार नाही, यासाठी कृषी विभागाने आतापासूनच कामाला लागावे. पीकविमा मंजूर करताना मंडळाऐवजी गाव केंद्र मानून पिकाला विमा संरक्षण मिळाले पाहिजे. जिल्ह्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे नियोजन असले, तरी कृषी विभागाने फलोत्पादनात नावीन्यपूर्ण प्रयोग राबविण्याची गरज आहे. जिल्ह्याचे हवामान खजूर व इतर कोणत्या फळपिकांसाठी पोषक आहे, याबाबत संशोधन करून शेतकऱ्यांत प्रबोधन करावे व फलोत्पादनाचे नवीन प्रयोग राबविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. जिल्ह्यात एक हजार ९१२ शेतीपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत. हा प्रकार चुकीचा असून शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना तातडीने जोडण्या द्याव्यात, असे श्री. देशमुख यांनी महावितरणला बजाविले. कृषी विभागाने सोयाबीन हे फूड ग्रेड आहे की नॉनफूड ग्रेड आहे, तसेच जीएम आहे का? याची सविस्तर माहिती घेऊन अहवाल द्यावा, अशी सूचनाही श्री. देशमुख यांनी केली.

लातूरहून बाराशे टन द्राक्षांची निर्यात, टाळेबंदीमध्ये उत्पादकांना दिलासा

घरवापसी मजुरांचा लाभ घ्या
शेततळ्यांतून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेततळी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे. शेततळ्यामुळे व पिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ, मागेल त्याला शेततळे या धर्तीवर मागेल त्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर देता येईल का, याबाबत नियोजन करावे. यामुळे टाळेबंदीमुळे गावाकडे परतलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळेल आणि शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधाही उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त करीत यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. राज्यमंत्री बनसोडे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची देशमुख यांनी दखल घेत सूचनांवर केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती प्रशासनाकडून देण्यात येईल, असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Quality Seeds To Be Available For Farmers, Minister Deshmukh Order