
हिंगोलीतील ७५ गावे होणार ओडीएफ प्लस
हिंगोली : देशभरात आजादी का अमृत महोत्सव जोमाने राबवण्यात येत आहे. याचे औचित्य साधत हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात स्वातंत्र्याचा महोत्सव राबवून ओडीएफ प्लस गाव उत्सव हे अभियान जिल्ह्यात एक ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविले जाणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ७५ गावे ओडीएफ प्लस (हागणदारीमुक्त) होणार आहेत.
स्वातंत्र्याची ७५ वर्ष आजादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील ७५ गावे ओडीएफ प्लस जाहीर केली जाणार आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेचा हा अभिनव उपक्रम आहे. स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी सध्या गावपातळीपर्यंत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-दोन गाव पातळीवर जोमाने राबवला जात आहे. आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. केंद्र शासनाने ग्रामीण भागातील स्वच्छतेची ही चळवळ अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने हागणदारीमुक्त अधिक म्हणजेच ओडीएफ प्लस संकल्पना अस्तित्वात आणली. संपूर्ण जिल्हा २०२४ पर्यंत हागणदारी मुक्त प्लस उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ओडीफ प्लस गावाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान राबविणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोन्द्रे यांच्या मार्गदर्शन व संनियंत्रणाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून या कालावधीत अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
असे आहेत उपक्रम
गावात सरपंच सचिवांची सभा, सर्व गावांना भेटीद्वारे विविध कामे पूर्ण करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, शासकीय नीम शासकीय कार्यालय स्वच्छता गृहे साफसफाई, शालेय विद्यार्थ्यांची प्रबोधन जनजागृती फेरी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन झालेल्या सर्व कामांचे छायाचित्र संकेतस्थळावर जिओ टॅग करणे, गावांतील पिण्याचे पाण्याची स्रोताची तपासणी, शुद्ध व स्वच्छ पाण्याची सोय, गावातील स्रोताची परिसर स्वच्छता. सर्व कामे अभियान कालावधीत राबविली जाणार आहेत. १५ ऑगस्टला ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देऊन गाव उत्सव साजरा करून ओडीफ प्लस म्हणून गाव घोषित करण्यात येणार आहे.
Web Title: Hingoli 75 Villages In Will Be Odf Plus Zilla Parishad Officer Campaign
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..