Hingoli : हिंगोलीत साडेपाच लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli

Hingoli : हिंगोलीत साडेपाच लाखांचा गुटखा जप्त

हिंगोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील पेन्शनपुरा भागात एका घरावर छापा टाकून केलेल्या कारवाईत पाच लाख ६९ हजार ३६० रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले असून, एकाचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पेन्शनपुरा भागात एका घरात पानमसाला, तंबाखू व गुटख्याची पोते साठवणूक केल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, राजेश मलपिल्लू, शिवसांब घेवारे, जमादार सुनील अंभोरे, गजानन पोकळे, राजू ठाकूर, नितीन गोरे, विशाल खंडागळे, संभाजी लकुळे, किशोर सावंत, रविना घुमनर यांच्या पथकाने मंगळवारी रात्री पेन्शनपुरा भागात तपासणी सुरू केली होती.

यामध्ये युनूसखॉं पठाण याच्या घरात गुटखा व सुगंधित तंबाखू असल्याची माहिती मिळाली. नंतर पोलिसांनी सदरील घरावर छापा टाकला असता घरात जवळपास पाच लाख ६९ हजार ३६० रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आली.

या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक गोपीनवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात युनुसखॉं जब्बारखॉं पठाण व वसीमखॉं जब्बार खॉं पठाण या दोघांवर बुधवारी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी युनुसखॉं यास ताब्यात घेतले असून, वसीमखॉं मात्र फरार आहे. त्याच्या अटकेनंतरच हा गुटखा व तंबाखू कोठून खरेदी केली, याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :HingolicrimeCrime Branch