हिंगोली : वीज चोरी करणाऱ्या २७५ आकडेबहाद्दरांवर कारवाई

राजेश दारव्हेकर
Friday, 23 October 2020

वीज चोरून वापरणाऱ्या २२ गावामधील २७५ वीज चोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली.

हिंगोली : जिल्हयातील वीज चोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्या वतीने गेली दोन दिवस आकडे टाकून अनधीकृतपणे वीज चोरून वापरणाऱ्या २२ गावामधील २७५ वीज चोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली. ही मोहिम यापुढेही चालूच राहणार असून जिल्हयातील सर्व उपविभागाअंतर्गत येणाऱ्या वीजचोरी बहूल गावांमध्ये वीजकायदा २००३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा बसावा, अनधीकृतपणे वीज वापरल्याने रोहीत्रावर जास्त भार येवून रोहीत्र  नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकडे टाकून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहीमेला गती देण्याच्या दृष्टीने नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या सुचनेनुसार पाच उपविभागा अंतर्गत वीजचोरांवरती मोठयाप्रमाणावर कारवाई केली जात आहे.

या भागातील वीज चोर

वारंवार अधीकृतपणे वीज कनेकशन घेण्याबाबत विनंती करुनही अनेक लोक वीजेच्या तारेवर आकडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर गेली दोन दिवस आक्रमकपणे जोरदार मोहीम राबवून झारा १०, वारंगा मसाईमध्ये १४, वडगाव येथे १४ तर अजेगाव ८, साखरा बाराखडी तांडा येथील १३, वसमत ८, पांगरा शिंदे १२,पार्डी खु. येथील २ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली तसेच शिवणी १२, पिंपरी खु. १२ घोडा ६, ब्राम्हणवाडा ११, गीरगाव १६, वखारी १८, कुरूंदा २५, रिसाळा ७, पहेनी १३, बेलवाडी १८, लाख २०, जवळाबाजार २१ तर हिंगोली शहरातील मसतान नगर परिसरामधील १५ आकोडे बहाद्दर वीजचोरांवरती कारवाई करण्यात आली.

वीज चोरी केलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात येते.

वीज चोरी पकडल्यानंतर ग्राहकांला वीज चोरी केलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात येते. सदर  आकारणीचे बिल न भरल्यास सबंधितांवर गुन्हाही दाखल होवू शकते. यामध्ये आकडे टाकून विजेचा वापर करणे, शेजाऱ्याकडून अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर करतांना महावितरण कर्मचाऱ्यांना आढळून आल्यास संबंधित ग्राहकांवर विघुत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येत आहे. यात थकबाकीदार ग्राहकाने शेजाऱ्याकडून विजेचा वापर केल्यास व शेजाऱ्याने परस्पर वीज पुरवठा केल्यास दोघांवरही कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

ग्राहकांवर कलम १३५, १३८ नुसार कारवाई करण्यात येते

यामध्ये शेजाऱ्याकडून मीटरही बंद होवू शकते. व आकडा टाकून विजेचा वापर करणे, वाहिनीमध्ये छेडछाड करणे  अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर केल्यास संबंधीत ग्राहकांवर कलम १३५, १३८ नुसार कारवाई करण्यात येते. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होवून संबंधितांना अटकही होवू शकते. या वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते. त्यामुळे अधीकृत वीजजोडणी घेवूनच वीजवापर करावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Action taken against 275 power thieves nanded news