
सेनगाव शहरातील एका व्यक्तीच्या नावावर असलेले मीटर महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून आपल्या मर्जीतील ग्राहकाला वापर करण्यासाठी दिले आहे. मात्र ज्या व्यक्तीच्या नावावर हे मीटर आहे.
सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून विज ग्राहकांची फसवणूक करून त्यांना अव्वाच्या सव्वा बिले दिली जात आहेत. तर काही मर्जीतील विज ग्राहकांना दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असलेले मीटर वापर करण्यासाठी देऊन त्याला बिल न देताच वार्षिक सहा हजार रुपये वसूली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे.
सेनगाव शहरातील एका व्यक्तीच्या नावावर असलेले मीटर महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून आपल्या मर्जीतील ग्राहकाला वापर करण्यासाठी दिले आहे. मात्र ज्या व्यक्तीच्या नावावर हे मीटर आहे. त्या व्यक्तीला गेल्या तीन वर्षापासून विज बिल जात आहे. परंतु त्यांचा वापरच नसल्यामुळे त्यांना या प्रकाराचा उलघड़ा लागत नसल्यामुळे त्यांनी ते बिल घेऊन चौकशी केली असता. ते मीटर टी पॉइंटवर आढळून आले. त्या मीटरचा वापर कर्त्यास विचारणा केली असता. त्याने सांगितले की, हे मीटर माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून आहे. आणि संबंधित कर्मचारी मला बिल देत नसून माझ्याकडून वार्षिक सहा हजार रुपये वसूली करतो.
हा प्रकार ऐकल्यानंतर आजु- बाजुच्या सामान्य नागरिकांना धक्काच बसला. आता या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कार्यवाही होते. की हा प्रकार कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी देवाण- घेवाण करून मिटणार की काय असा प्रश्न नागरिकांतुन उपस्थित केला जात आहे. असाच प्रकार शहरातील इतर ठिकाणी सुध्दा सुरु असून संबंधित कर्मचारी लाखो रुपये अवैध मार्गाने मिळवत असल्याचे या प्रकारावरुन स्पष्ट दिसून येत आहे. तर शहरातील विज ग्राहकांना रेडिंग न तपासताच अव्वाच्या सव्वा बिले देऊन त्यांची फसवणूक केली जात असल्याचे सुध्दा निदर्शनास आले आहे.
डिसेंबर महिन्यात एक हजार १०० रुपये बिल आले तर जानेवारी तब्बल नई हजार ५४० रुपये विज बिल देऊन फसवणूक होत असल्याचा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार व विज ग्राहकांची लूट करणाऱ्या कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांच्या कठोर कार्यवाही करण्याची मागणी शहरातील विज ग्राहकांतुन केली जात आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे