
Hingoli : औंढ्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात घोषणा
हिंगोली : औंढा नागनाथ येथील नागनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधीची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मराठवाड्यातील पाच ज्योतिर्लिंगांसाठी तीनशे कोटी रुपयांच्या निधींची तरतूद करण्यात आली. त्यात नागनाथ मंदिराचा समावेश आहे. यामुळे आता येथे विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. रथोत्सव कार्यक्रम असतो. यामुळे येथे हजारो भाविक सहभागी होतात; तसेच श्रावण महिन्यात महिनाभर येथे भाविकांची रेलचेल असते. नागपंचमी, आषाढी एकादशी आदी सणालादेखील भाविकांची नेहमी गर्दी असते.
तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमार्फत शासनाकडे सादर केला होता. यामध्ये ६० कोटी रुपयांच्या प्रस्तावात मंदिराच्या परिसरात पार्किंग व्यवस्था, भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास, डिजिटल लॉकर, उपाहारगृह, नियंत्रण कक्ष,
होमकुंड, बॅरिकेड्स, ऑपरेटर रूम, सीसीटीव्ही कॅमेरे यासह इतर बाबींचा समावेश होता. या प्रस्तावामुळे अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले होते. यात नागनाथ मंदिरासाठी अर्थसंकल्पात निधीची घोषणा झाली असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.