Hingoli : भाजपकडून युवा चेहऱ्याला मिळणार संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

Hingoli : भाजपकडून युवा चेहऱ्याला मिळणार संधी

हिंगोली : लोकसभा मतदार संघात भाजपकडून आता युवा चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठी युवा नेतृत्व म्हणून रामदास पाटील सुमठाणकरांचे नाव चर्चेत असून, लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी युवा मोर्चाच्या वतीने मेळावे घेतले जात आहेत.

हिंगोली लोकसभेसाठी शिंदे गटाकडून रस्सीखेच सुरू असून, लोक प्रतिनिधींचे मुंबई, दिल्ली, दौरे वाढले आहेत. पण, हिंगोली लोकसभा मतदार संघात यावेळी भाजपकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

२०१४ ला मोदी लाटेमध्येही या मतदार संघातून काँग्रेला विजय मिळाला होता. त्यामुळे या मतदार संघाकडे भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी भाजपकडून वरिष्ठ पातळीवर तसेच स्थानिक पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. यावेळी मतदार संघात युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी मुख्याधिकारी पदाचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केलेले रामदास पाटील सुमठाणकर यांचे नाव चर्चेत आहे.

हिंगोली, किनवट या ठिकाणी त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कारकीर्द चांगलीच गाजवली आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या शिवाय वसमत विधानसभा मतदार संघ त्यांचा होमपिच असून, या ठिकाणीही त्यांनी चांगले काम केले आहे.

विशेष म्हणजे भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांनी जनसंपर्क वाढवून सामान्य कार्यकर्त्यांसोबच जनतेच्या अडचणी जाणून घेत त्या सोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची लोकसभा मतदार संघात ओळख निर्माण झाली आहे. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून मेळावे घेतले जात असून, भाजपच्या कार्यक्रमातूनही त्यांच्या कामाची माहिती दिली जाऊ लागली आहे.

प्रशासकीय कामकाजाचा अनुभव पाठीशी

प्रशासकीय कामकाज करताना आक्रमक भूमिका घेणाऱ्या पाटील यांच्या रूपाने भाजपला लोकसभा मतदार संघात आक्रमक चेहरा मिळाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. भाजपच्या कार्यक्रमांमुळे राजकीय वर्तुळातून निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे.