हिंगोली : आखाडा बाळापूर परिसरातील जिल्हा परिषदेच्या बंद शाळाही झाल्या 'बोलक्या'

चंद्रमुनी बलखंडे
Friday, 18 December 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोना बधितांची संख्या कमी होत असल्याने शासनाने नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास काही अटीवर परवानगी दिली आहे. 2020-21 शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला आहे.

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र आखाडा बाळापूर ( ता. कळमनुरी) परिसरातील बहुतांश शिक्षकांनी वेळेचा सदुपयोग घेत शाळेच्या भिंतीवर विविध चित्रे काढून भिंती बोलक्या केल्या आहेत. बोलक्या भिंती विद्यार्थ्यांना खुणावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोना बधितांची संख्या कमी होत असल्याने शासनाने नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास काही अटीवर परवानगी दिली आहे. 2020-21 शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला आहे. या काळात जवळपास सर्वच प्राथमिक शाळा बंद आहेत. काही शाळा ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवत आहेत. मात्र ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे, पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी अडचणी येत आहेत. तरीही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न शिक्षक करीत आहेत.

हेही वाचा हिंगोली : अवैध धंद्याला लगाम लावण्यास सेनगावच्या पोलिस निरीक्षकांसमोर आव्हान

दरम्यान आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दररोज किमान एका शिक्षकांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेत विद्यार्थी येत नसल्याने बहुतांश शिक्षकांनी वेळेचा सदुपयोग घेण्याचा निर्णय घेतला.  विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित करून त्याला शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या भिंतीवर अभ्यासक्रमावर आधारित विविध चित्रे रेखाटण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषद शाळा पिंपरी, फुटाना, पावनमारी, साळवा आदी जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर  विविध चित्रे रेखटण्यास सुरवात झाली.

शाळा बंद असल्याने काही दिवसातच शाळेचे चित्रच पालटले. जिल्हा परिषदेच्या शाळेवर अंशकालीन निदेशक म्हणून काम करणाऱ्या चित्रकार तथा शिक्षक राहुल पंडित यांनी अभ्यासक्रमावर आधारित विविध चित्रे रेखाटून भिंती बोलक्या केल्या.  शाळेत प्रवेश केल्यानंतर ही चित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मुख्याध्यापक, शिक्षकांची कल्पक बुद्धी, शाळा समिती व  पालकांच्या पुढाकारातून आता जिल्हा परिषेदेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेच्या तोडीचे शिक्षण मिळण्यास मदत झाली आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Closed Zilla Parishad schools in Akhada Balapur area also became 'talkative' hingoli news