हिंगोली जिल्हा प्रशासन कॉफीमुक्तीसाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

जिल्‍ह्यात मंगळवारपासून बारावीच्या परीक्षा
३३ केंद्रांवर १३ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

हिंगोली ः शालांत माध्यमिक व उच्य माध्यमिक मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता. १८) जिल्ह्यातील ३३ परीक्षा केंद्रांवर १३ हजार २५२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून परीक्षेची जय्यत तयारी शिक्षण विभागाने केल्याची माहिती शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे यांनी दिली आहे.

माध्यमिक व उच्य माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने ता. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. मंगळवारी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर सकाळी अकरा ते दोन या वेळेत घेतला जाणार आहे. 

असे आहेत तालुकानिहाय केंद्र
जिल्ह्यातील ३३ केंद्रांवर १३ हजार २५२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये हिंगोली आठ केंद्र, कळमनुरी पाच, वसमत दहा, औंढा पाच, तर सेनगाव पाच असे एकूण मिळून ३३ केंद्रांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्‍मोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, उपशिक्षणाधिकारी श्री. मलदोडे यांच्यासह श्री. पळसकर, श्री. वडकुते आदींनी परीक्षेची जोरदार तयारी केली आहे.

हेही वाचा - ‘बेटी बचाव- बेटी पढाओ’ अभियानाला नांदेडच्या पित्याची बळकटी

७०३ कर्मचारी नियुक्त
परीक्षेसाठी ६७० पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. तर ३३ केंद्रसंचालक, असे एकूण मिळून ७०३ कर्मचारी परीक्षेच्या केंद्रांवर काम पाहणार आहेत. तसेच परीक्षेदरम्यान, काही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी पाच भरारी, तर तीन बैठे पथकांची स्थापना केली आहे. भरारी पथकात माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राचार्य डायट, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि विशेष म्हणजे महिला भरारी पथकाचादेखील समावेश केला आहे. तर बैठे पथकात महसूल, पंचायत विभाग व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.

भरारी व बैठे पथकाचे राहणार नियंत्रण
परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी भरारी व बैठे पथकाकडून काम केले जाणार आहे. याशिवाय वेळोवेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनीदेखील परीक्षेच्या कालावधीत केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. त्यामुळे कॉपीबहादरांवर नियंत्रण राहील. तसेच परीक्षा केंद्रांवर गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस, होमगार्ड तैनात केले जाणार आहेत.

हेही पाहिलेच पाहिजे - Video: अबब...! मोबाईल ‘रेंज’साठी झाडावर स्वारी

पथकासोबत राहणार व्हिडिओ कॅमेरा
बारावीच्या परीक्षेदरम्यान पथकाला काही संशय येत असल्यास त्या केंद्रावर भरारी पथकाकडून केंद्रातील विद्यार्थ्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद करणार तसेच पालकांकडून कॉपी वगैरे पुरविल्या जात असल्यास तेही दृश्य कैद केले जाणार आहे.

जिल्‍ह्यात परीक्षा तयारीची दक्षता बैठक
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे मार्फत जिल्ह्यात मंगळवार (ता. १८) पासून परीक्षेला सुरवात होत आहे. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पाडल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. मागील सात वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात सुरवात झाली. तेव्हापासून कॉपीमुक्त अभियान बारावी व दहावी परीक्षेदरम्यान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ३३ केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे. त्यानुसार परीक्षेतील कॉपीला आळा घालण्यासाठी हे अभियान यंदाही राबविण्याचा निर्णय झालेल्या दक्षता बैठकीत घेतला असल्याचे श्री. जयवंशी यांनी सांगितले.

कॉपी केल्यास रेस्टिकेट करण्याचे आदेश
भरारी व बैठे पथकालादेखील सूचना दिल्या आहेत. जर परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कॉपी करीत असेल तर त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करून रेस्टिकेट करण्याचे आदेश दिले आहेत. कॉपीमुक्त अभियानामुळे हुशार विद्यार्थ्यांना चांगली प्रगती करता येईल आणि पुढे त्यांना मेडिकल, इंजिनीअरिंगसाठी प्रवेश सहज शक्य होईल, असे श्री. जयवंशी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli District Administration ready