esakal | Video: अबब...! मोबाईल ‘रेंज’साठी झाडावर स्वारी  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गावकऱ्यांचा फोन लावण्यासाठी अनोखा फंडा
सेनगाव तालुक्‍यातील ताकतोडा येथील प्रकार

Video: अबब...! मोबाईल ‘रेंज’साठी झाडावर स्वारी  

sakal_logo
By
जगन्नाथ पुरी

सेनगाव (जि. हिंगोली) ः केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केल्याचा गाजावाजा केल्या जातो, मात्र तालुक्यातील ताकतोडा येथील ग्रामस्थांना गावात मोबाईल कंपनीचे एकही टॉवर नसल्याने रेंज अभावी चक्क झाडावर जाऊन फोन लावावा लागतो.

तालुक्यातील ताकतोडा गावाची जवळपास तीन हजार लोकसंख्या आहे. बहुतांशी नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथील ग्रामस्थांना गावात कोणत्याच मोबाईल कंपनीच्या टॉवरची व्यवस्था कंपनीकडून केली गेली नाही. 

अँड्रॉइड फोन उरले नावालाच
या गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील केंद्र बुद्रुक येथील टॉवरच्या नेटवर्कवर मोबाईल चालतात. याउलट या गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील हाताळा येथील टॉवरचे नेटवर्क मिळत नाही. येथील बहुतांश कुटुंबियांकडे मोबाईल आहेत. सुशिक्षित व तरुणांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. गावातून व्हिडिओ कॉल नेटवर्क करणे दुरापास्तच आहे.

हेही वाचा - श्रृतीच्या मदतीला सांची आली धावून : कशी ते वाचाच


नेटवर्कची शोधाशोध करून फोन लावण्याची वेळ
अनेकदा गावालगतच्या झाडावर जाऊन तरुणांना नेटवर्कची शोधाशोध करून फोन लावण्याची वेळ येते. केंद्र सरकारकडून डिजिटल शिकवणीसाठी डिजिटल शाळा केल्या जातात. त्यासोबतच विविध क्षेत्रात ही यंत्रणा कार्यान्वित केल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, या गावात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या असल्याने डिजीटलपासून हे गाव वंचित राहिले आहे. 

मोबाईल कंपन्या घेईनात दखल
मागील अनेक महिन्यापासून गावात मोबाईल टॉवर उभारून ग्राहकांची गैरसोय टाळावी, ही मागणी पुढे येते. मात्र, त्याची दखल कंपन्यांकडून घेण्यात आली नाही. परिणामी अनेक मोबाईलधारकांना शेतात जाऊन किंवा उंच ठिकाणावर मोबाईलसाठी नेटवर्क शोधाशोध करावी लागत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - विभागीय आयुक्तांनी घेतली आधिकाऱ्यांची ‘शाळा’

ग्रामस्थांत संतापाची लाट 
टॉवरअभावी मोबाईलधारकांना गैरसोयींन सामोरे जावे लागत आहे. मोबाईल कंपन्याकडून नेटवर्क उपलब्धीसाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांना उंच ठिकाणाहून मोबाईलचा वापर करावा लागत असल्याने त्यांच्यातून संतापाची लाट पसरली आहे. यामध्ये कोणतीही सुधारणा न झाल्यास मोबाईल कंपनी मालकांचे पुतळे दहन करून निषेध व्यक्त करण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत

डिजिटल योजनेचा उडाला बोजवारा 
केंद्र सरकार डिजिटल यंत्रणेवर भर देते. त्याचा गवगवा मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्यक्षात ताकतोडा येथे कोणत्याच मोबाईल कंपनीचा टॉवर नसल्याने डिजिटल योजनेचा बोजवारा उडाला आहे. उंच ठिकाण, शेत किंवा झाडावर जाऊन नेटवर्क शोधण्याची वेळ मोबाईल धारकांवर आली आहे. विविध मोबाईल कंपनी मालकांचे पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला जाणार आहे.
- नामदेव पतंगे, नागरिक, ताकतोडा.