
शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप बसावा म्हणून ‘डिजिटल इंडिया’ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही शासकीय कामासाठी लाचेची मागणी अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहे.
कळमनुरी (जि. हिंगोली) : शेतीच्या नोंदीमध्ये फेरफार करण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या तालुक्यातील सेलसुरा सज्जाच्या तलाठी व त्याच्या सहाय्यकाला लाच लुचपत विभागाच्या पथकांनी सोमवार (ता.२१) ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तालुक्यातील हातमाली येथील शेतकरी राजेंद्र गुलाबराव भोयर यांची हातमाली गाव शिवारात गट नंबर ११८ व गट नंबर १४० मध्ये शेती आहे. या शेतीच्या नोंदीमध्ये फेरफार करण्यासाठी शेतकरी श्री. भोयर यांनी सेलसुरा सज्जाचे तलाठी श्री. बेले यांच्याकडे पाठपुरावा चालविला होता. मात्र शेतीच्या नोंदी व फेरफार करण्याकरिता तलाठी श्री. बेले व तहसील कार्यालयातील कोतवाल शेख हमीद याने शेतीच्या फेरफार व नोंदी घेण्याकरिता तहसील कार्यालयामधून आपल्या ओळखीच्या मदतीने काम करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
हेही वाचा - नांदेड - बिदर रेल्वे मार्गसाठी जमीन अधिग्रहणासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे निर्देश
मात्र संबंधित शेतकऱ्याकडून लाचेची मागणी केल्यानंतर शेतकरी राजेंद्र भोयर यांनी या प्रकरणी हिंगोली येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाचे प्रभारी उपअधीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक ममता अफुने, कर्मचारी विजय उपरे, अविनाश कीर्तनकार ज्ञानेश्वर पंचलिंगे, विनोद देशमुख, तानाजी मुंडे, संतोष दुमाने, प्रमोद थोरात, रुद्रा कबाडे ,यांच्या पथकाने तपासणी केली असता पाच हजार रुपयांची लाच मारल्याचे स्पष्ट झाले.
हे देखील वाचाच - कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध, गावकऱ्यांनी ठराव घेऊन निवडले सदस्य
त्यानंतर तक्रारदार शेतकरी राजेंद्र भोयर यांनी सोमवारी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तलाठी श्री. बेले व कोतवाल शेख हमीद यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी श्री. बेले व कोतवाल शेख हमीद यांना सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत विभागाचे अधिकारी करीत आहेत.