हिंगोली : कोरोना काळात गाळे बांधकाम, जिल्हा परिषदेच्या स्थायीच्या बैठकीत गाजले

राजेश दारव्हेकर
Saturday, 10 October 2020

जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.९) स्थायी समितीची ऑनलाईन सभा झाली.

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या आवारात गाळे बांधकाम करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. परंतू  ऐन कोरोना काळात गाळे बांधकामावर सवासे कोटी खर्च कशा साठी खर्च करता असा प्रश्न अपक्ष सदस्य अजित मगर यांनी स्थायीच्या बैठकीत उपस्थित केला असता त्यावर अधिकारी निरुत्तर झाले.

येथील जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. नऊ) स्थायी समितीची ऑनलाईन सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष मनीष आखरे, शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण, समाज कल्याण सभापती फकिरा मुंढे, महिला बाल कल्याण सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकर सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, धनवंतकुमार माळी ,डॉ. मिलिंद पोहरे, गणेश वाघ, डॉ. प्रवीनकुमार घुले, डॉ. शिवाजी पवार आदींची उपस्थिती होती. इतर समिती सदस्यांनी ऑनलाईन बैठकीला हजेरी लावली.

हेही वाचाअर्धापूर : शहराच्या विविध भागात कच-याचे ढिग, सत्ताधारी नगरसेवकात बेबनाव

गाळे काढण्या ऐवजी जर कोविड हॉस्पिटल उभारले तर रुग्णांना याचा फायदा होईल

ऐन कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या आवारात सवासे कोटी रुपये खर्च करून गाळे काढण्या ऐवजी जर कोविड हॉस्पिटल उभारले तर रुग्णांना याचा फायदा होईल यासाठी गाळे बांधकामासाठी ऑर्डर दिल्यास यात अधिकारी अडकणार असा प्रश्न अजित मगर यांनी उपस्थित केला असता यावर अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असे थातूर मातूर उत्तर दिले. जर गाळे बांधकाम सुरू झाले तर आपण राज्य शासनाकडे तक्रार करणार असे मगर यांनी सांगितले. त्यानंतर शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांनी जिल्ह्यात बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्या असून,भिंतींना तडे पडले आहेत, त्यामुळे केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर आहेत.

हट्टा येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम

त्यामुळे या शाळा पाडून पुनर बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी असा मुद्दा उपस्थित केला असता यावर सीईओ शर्मा यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेत हा प्रश्न सोडविण्याचे अश्वासन दिले. तर वसमत तालुक्यातील हट्टा येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम तीन वर्षांपूर्वी झाले असताना हस्तांतरण करण्यापूर्वीच या इमारतीचे दरवाजे उखडून पडले असल्याचा मुद्दा रत्नमाला चव्हाण यांनी उपस्थित केला असता, यावर आरोग्य विभागाने संबंधित गुत्तेदाराची चौकशी करण्यात येईल असे अश्वासन दिले.

येथे क्लिक करानांदेड : रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांचे कोविडच्या विरोधात जन जागरण

वादळी होणारी सभा ही लवकरच गुंडाळल्याने अधिकाऱ्यांना मोकळे झाले

याशिवाय  आशा वर्कर यांना कोरोना काळात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत सर्व इत्यंभूत माहिती अँड्रॉइड मोबाईलमध्ये भरण्यास सांगितले जात आहे. परंतू आधीच आशा वर्कर यांना मानधन कमी असल्याने ते कुठून खरेदी करणार असा सवाल जीप सदस्य दिलीप देसाई यांनी अधिकाऱ्यांना उपस्थित केला असता यावर अधिकाऱ्यांनी काहीतरी तोडगा काढू असे थातूर मातूर उत्तर देऊन मोकळे झाले. आज झालेली सभा मात्र लवकरच गुंडाळण्यात आली. आजच्या सभेला काही सदस्यांनी हजेरी लावली तर काहींनी लावलीच नाही. त्यामुळे वादळी होणारी सभा ही लवकरच गुंडाळल्याने अधिकाऱ्यांना मोकळे झाले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: During the Corona period, the construction of slums was announced in the standing meeting of Zilla Parishad hingoli news