
Hingoli : E-KYC प्रमाणीकरणासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
हिंगोली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचे बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवून ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या.
त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले होते. सद्यःस्थितीत दोन जून अखेर राज्यातील आधार प्रमाणित १०६.६८ लाख लाभार्थ्यांपैकी ५७.३३ लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ४९.१४ लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. त्यामुळे आता ३१ जुलै अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
Web Title: Hingoli E Kyc Deadline Authentication Extended Till July 31 Kisan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..