
जिल्हयात यावर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीन, तुर, उडीद, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
हिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले तरीही पिक विमा कंपनीकडून केवळ १८०० रुपयांची रक्कम दिल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे १८०० रुपयांचे धनादेश पाठवूनत्याचा निषेध केला आहे.
जिल्हयात यावर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीन, तुर, उडीद, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकविम्यात सर्वाधिक सोयाबीनचा पिकविमा काढला होता. त्यासाठी हेक्टरी ९०० रुपयांची रक्कम शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीकडे भरणा केली होती. तर २०० रुपये ऑनलाईन विमा भरण्यासाठी लागले होते. दरम्यान, शंभर टक्के नुकसान झाल्यामुळे पिकविमा कंपनीने किमान ४० ते ४३ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देणे अपेक्षीत होते. मात्र डोंगरकडा परिसरातील शेतकऱ्यांना हेक्टरी विम्याची मदत मिळाली आहे.
याप्रकारामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, माधव सावके, दीपक सावके, सुरज सावके, देवबा सावके, कोंडजी सावके आदी शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २४) पिकविमा कंपनीचे कार्यालय गाठून चार तास ठिय्या मांडला होता. त्यानंतर डोंगरकडा येथील शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमुळे रावसाहेब अडकिणे व उध्दव गावंडे यांनी शेतकऱ्या मार्फत पिकविमा कंपनीकडून मिळालेला १,८०० रुपयांचा पिकविमा नाकारत त्याचा धनादेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे पाठविला आहे. शेतकऱ्यांना नियमानुसार पिकविमा मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे