हिंगोली : प्राप्त निधी वेळेत खर्च करा

पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचे निर्देश; जिल्हा नियोजन समितीची बैठक
Hingoli District Planning Committee Meeting
Hingoli District Planning Committee Meetingsakal

हिंगोली : जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी ऑनलाइन बैठक झाली. आगामी वर्षात २७० कोटी २१ लाख ७१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०२२-२३ चा प्राप्त निधी वेळेत खर्च करण्यासाठी कामांना मंजुरी देण्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेंतर्गत प्राप्त झालेला निधीचे योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील विकास कामांवर वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्या.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, राजू नवघरे, डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, ए.एल. बोंद्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पर्यटन स्थळांना ब दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री गायकवाड यांनी दिल्या.

२२९ कोटींच्या खर्चाला मान्यता

२०२१-२२ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी योजनेत एकूण २२९ कोटी ६२ लाख ५१ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी जिल्ह्यात विकास कामांवर झालेल्या २२९ कोटी ४३ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.

शाळांसाठी काहीसा आमदार निधी द्यावा

जिल्ह्यातील सर्व निजामकालीन शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून, त्याचे नूतनीकरण करण्यासाठी राज्याकडून ९० टक्के निधी देण्यात येणार आहे. उर्वरित १० टक्के लोकवाटा जिल्ह्यातील आमदारांनी आपल्या मतदार संघातील शाळा दुरुस्तीसाठी आमदार निधीतून द्यावा, अशी विनंती करण्यात आली. यावेळी आमदार नवघरे यांनी बाभूळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com