हिंगोली : १७ लाख रुपये किमंतीचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राजेश दारव्हेकर
Thursday, 1 October 2020

एका टेम्पोतून आरजे कंपनीच्या गुटख्याची ११० पोते जप्त केले असून या गुटख्याची किंमत १७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे

हिंगोली : हिंगोली ते वाशीम मार्गावर बासंबा पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी  ता. एक सकाळी साडेअकराच्या सुमारास एका टेम्पोतून आरजे कंपनीच्या गुटख्याची ११० पोते जप्त केले असून या गुटख्याची किंमत १७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी टेम्पो व गुटखा जप्त केला असून  दोघांची चौकशी सुरु केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्हयातील कारंजा येथून एका टेम्पोमध्ये गुटख्याची वाहतुक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदिश भंडारवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, हवालदार बालाजी बोके, संभाजी लकुळे,  सुनील अंभोरे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, आशिष उंबरकर, विलास सोनवणे, राजू ठाकूर यांच्यासह पथकाने वाशीम येथून येणाऱ्या वाहनांची तपासणी सरु केली होती. 

हेही वाचा -  नांदेड : ग्रामसेवकाने केला साडेचार लाखाचा अपहार, चौकशीची मागणी -

मका असलेल्या पोत्यामधे गुटख्याची पोते

सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान, पोलिसांनी टेम्पो (एमएच४८ जे ०९०४)  थांबवून चालक शेख बबलू रा. अर्धापुर जि. नांदेड याची चौकशी सुरु केली. त्याने चौकशीमध्ये टेम्पोत मकाचे पोते असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी टेम्पो थेट पोलिस अधिक्षक कार्यालयात आणून तपासणी केली. यामध्ये मका असलेल्या पोत्यामधे गुटख्याची पोते आढळून आले. 

आरजे नावाचा ११० पोते गुटखा

यामध्ये आरजे नावाचा ११० पोते गुटखा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चालक शेख बबलू व शेख जाकेर  दोघे रा . अर्धापूर, जि  नांदेड यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. सदरील गुटख्याची पोते कारंजा नांदेडकडे नेण्यात येत असल्याचे  चौकशीत समोर आले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Gutka worth Rs 17 lakh seized, action taken by local crime branch nanded news