
जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्त पेढीच्या माध्यमातून व विविध पक्ष संघटनेच्या मदतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते
हिंगोली : मागील वर्षात जिल्ह्यात १२३ रक्तदान शिबिराच्या माध्यमातून चार हजार ६०६ रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना एक प्रकारे जीवनदान दिल्याची माहिती जिल्हा रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. दीपमाला पाटील यांनी दिली. हा रक्तसाठा एक जानेवारी अखेरचा आहे.
जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तपेढीच्या माध्यमातून व विविध पक्ष संघटनेच्या मदतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्यातून संकलन होणाऱ्या पिशव्या गरजू व गर्भवती महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या महिलांना अल्पदरात रक्त पुरवठा केला जातो. मागील आठ महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केल्यामुळे रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला होता. टाळेबंदी उठताच पुन्हा मागील तीन चार महिन्यापासून जिल्हाभरात विविध पक्ष, संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त पिशव्या संकलन झाल्याने आजघडीला रुग्णालयात ३८१ उपलब्ध झाल्या आहेत. मागील वर्षात जिल्ह्यात १२३ रक्तदान शिबिरे घेण्यात आली होती. यामध्ये चार हजार ६०६ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने हे संकलन केलेल्या ४ हजार २९ पिशव्या अपघात, थाल्मेशिया, जेष्ठ नागरिक, एड्सग्रस्त बाधित रुग्णांना,गरजू रुग्णांना पुरवठा करण्यात आला. ही आकडेवारी एक जानेवारी अखेरची असल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - नांदेड : घ्या जाणून राष्ट्र पुरुष, जयंती आणि राष्ट्रीय दिन साजरा करण्याच्या तारखा -
जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१३ पासून रक्तपेढी सुरु करण्यात आली. या आठ वर्षात जिल्ह्यात६६८ रक्तदान शिबिरातून २९ हजार ६७८ रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान दान हेच श्रेष्ठ दान या उक्ती प्रमाणे गरजू लोकांना जीवनदान देण्याचे काम केले आहे. या रक्त संकलनातून आतापर्यन्त सहा हजार २१३ गर्भवती महिलांना मोफत रक्त पुरवठा केला आहे. तर सिकलसेल ,थाल्मेशिया रुग्ण ग्रस्त दहा वर्षाच्या आतील दोन हजार ६०२ बालकांना रक्तपुरवठा केला आहे. तसेच विशेष म्हणजे रक्तदाता ऐच्छिक कार्डवर आतापर्यन्त आठ हजार ६३५ गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवठा केला आहे. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, जेष्ठ नागरिक, एड्सग्रस्त बाधित, कोरोना रुग्ण, अपघातग्रस्त या रुग्णांचा रक्त पुरवठा केलेल्यात समावेश आहे.
दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढी प्रमुख डॉ. दीपमाला पाटील ,डॉ. सुनील पाटील पॅथॉलॉजिस्ट ,डॉ. स्वाती नूनेवार, एम. एस. मोहिते, एस. व्ही. सोळुंखे, ए. एस.मुंढे, एस. के. कोरडे, व्ही. एस. आंबटवार ,ए. वाय.जठाळे, एस. एस. निर्मल, बी. एन. नरवाडे, एस. बी. ठाकरे, एस. व्ही. तडस, एन. एल. होडगे हे अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ रक्त संकलन करण्यासाठी परिश्रम घेत असतात
रक्त पेढीतील गट निहाय उपलब्ध साठा
ए- पॉझिटिव्ह - ७०
ए - निगेटिव्ह - ६
बी - पॉझिटिव्ह - ११७
बी- निगेटिव्ह - १३
एबी- पॉझिटिव्ह - २३
एबी- निगेटिव्ह - १
ओ -पॉझिटिव्ह - १५१
ओ -निगेटिव्ह - झिरो
संपरादन- प्रल्हाद कांबळे