नांदेड : घ्या जाणून राष्ट्र पुरुष, जयंती आणि राष्ट्रीय दिन साजरा करण्याच्या तारखा

प्रल्हाद कांबळे
Saturday, 2 January 2021

सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक 15 डिसेंबर 2020 नुसार सर्व राष्ट्रीय पुरुष, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्यात यावेत.

नांदेड : या नविन वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय- निमशासकीय कार्यालयामध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना निर्देश दिले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक 15 डिसेंबर 2020 नुसार सर्व राष्ट्रीय पुरुष, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्यात यावेत. शासन निर्णयातील परिशिष्टात दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व रविवारी तसेच महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी येत असतील तरी ते कार्यक्रम आणि यासंदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सूचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत. सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील संबंधीत सर्व कार्यालयांना सदरचे कार्यक्रम घेण्याबाबत आवश्यक त्या सुचना देवून त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाची राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींची जयंती / राष्ट्रीय दिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. रविवार 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती, मंगळवार 12 जानेवारी रोजी  जिजाऊ माँ साहेब जयंती, मंगळवार 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती, शनिवार 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषच्रंद बोस जयंती, सोमवार 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जयंती, शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मंगळवार 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज जयंती, शनिवार 27 फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज जयंती (तिथीनुसार), शुक्रवार 12 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त कार्यक्रमाचे स्वरुप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे. 

मंगळवार 23 मार्च रोजी शहीद दिन निमित्त शहीद भगतसिंग, राजगूरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.  रविवार 11 एप्रिल  रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती, बुधवार 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शुक्रवार 30 एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, शुक्रवार 14 मे रोजी महात्मा बसवेश्वर जयंती (तिथीनुसार) कार्यक्रमाचे स्वरुप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे. शुक्रवार 21 मे रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस निमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ घेणे. शुक्रवार 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती, सोमवार 31 मे रोजी आहिल्यादेवी होळकर जयंती, रविवार 13 जुन रोजी महाराणा प्रतापसिंह जयंती (तिथीनुसार). शनिवार 26 जुन रोजी राजर्षि शाहू महाराज जयंती, गुरुवार 1 जुलै रोजी वसंतराव नाईक जयंती. 

शुक्रवार 23 जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधार टिळक जयंती, रविवार 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती, मंगळवार 3 ऑगस्ट रोजी क्रांतीसिंह नाना पाटील जयंती कार्यक्रमाचे स्वरुप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे. शुक्रवार 20 ऑगस्ट रोजी सद्भभावना दिवसानिमित्त सद्भभावना दिवसाची शपथ घेणे. मंगळवार 7 सप्टेंबर रोजी राजे उमाजी नाईक जयंती, शनिवार 25 सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती- अंत्योदय दिवस, शनिवार 2 ऑक्टोंबर रोजी  महात्मा गांधी जयंती, शनिवार 2 ऑक्टोंबर रोजी लाल बाहाद्दूर शास्त्री जयंती, शुक्रवार 15 ऑक्टोंबर रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती, बुधवार 20 ऑक्टोंबर रोजी महर्षि वाल्मिकी जयंती (तिथीनुसार), रविवार 31 ऑक्टोंबर रोजी इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे. 

रविवार 31 ऑक्टोंबर रोजी वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेणे. रविवार 14 नोंव्हेबर रोजी पंडीत नेहरु जयंती. सोमवार 15 नोंव्हेबर रोजी बिरसा मुंडा जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे. शुक्रवार 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ घेणे. शुक्रवार 26 नोंव्हेबर रोजी संविधान दिवसानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करणे. बुधवार 8 डिसेंबर  संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे या प्रमाणे कार्यक्रमाचे स्वरुप राहिल. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय 24 नोव्हेंबर 2008 मधील सुचनांनुसार विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांनी कार्यवाही करावी, असेही निर्देश दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Know the dates of National Men's Day, Jayanti and National Day celebrations nanded news