
हिंगोली जिल्ह्यात मनसेच्या शंभर पदाधिकारी कार्यकर्त्यांना नोटिसा
हिंगोली : जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शंभर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी महाआरती तसेच हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर , सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख , अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी तातडीने ठाणेदार यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. याशिवाय जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शंभर पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. ध्वनिक्षेपकाचा वापर करताना त्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील धडवाई हनुमान मंदिरात मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी महाआरती व हनुमान चालीसाचा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी मनसेचे शहर प्रमुख संतोष बांगर , संतोष खंदारे, विशाल सांगळे, युवा जिल्हाध्यक्ष रवि मुदिराज, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष दिपक सांगळे, विठ्ठल जाधव , कृष्णा पवार , ज्ञानेश्वर वीरकर, सिध्दांत कोकाटे, संजय कोकाटे, भैय्या सोळंके , गजानन कान्हडे राजू थिटे, आकाश धनमने , गजानन सरकटे, शुभम डोंगरदिवे, गोपाल कड, दिपक वैद्य, नागेश झुलझुले, सचिन पांढरे, बंडू देवडे दशरथ धोत्रे, ऋषिकेश गादेकर, पृथ्वीराज चव्हाण आदीची उपस्थिती होती.