
हिंगोली : शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर
हिंगोली: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा येणारा माल साठवून ठेवण्यासाठी जागा नसल्याने शेतकऱ्यांना चक्क आपला आणलेला माल रस्त्यावर टाकण्याची वेळ आल्याचे चित्र मंगळवारी (ता. २४) पाहावयास मिळत होते. दरम्यान, ढगाळ वातावरण असून, अवकाळी पावसाची शक्यता आहे. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
बाजार समितीमध्ये भुईमुगाच्या चार हजार पोत्यांची आवक झाली. दरम्यान, शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी बाजार समितीत जागाच नाही. त्यामुळे घाम गाळून पिकविलेला आपला माल रस्त्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र, याकडे बाजार समितीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात भुईमुगाची पेरणी केली होती. हे पीक काढून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले असता मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत जागाच नसल्याने शेतकऱ्यांना आपल्याकडील माल रस्त्यावर उन्हात टाकावा लागला. मात्र, दुपारनंतर वातावरणात जसजसा बदल होऊ लागला तसतसे शेतकरी आपला माल विकण्यासाठी धडपड करीत होते. गत वर्षीदेखील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली होती. परंतु, ठेवण्यासाठी शेडमध्ये जागा नसल्याने शेतकऱ्यांना हळद रस्त्यावर ठेवावी लागली. परिणामी, पावसाने तिचे नुकसान झाले होते. असे असतानाही बाजार समितीने यातून धडा घेतला नाही. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे बाजार समितीने पावसाळ्यापूर्वी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
Web Title: Hingoli Market Committee Farmers Goods Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..