
हिंगोली : आंदोलनाचा इशारा देताच बाजार समितीने दिले उत्तर
हिंगोली : बाजार समितीत शेती मालावरील कटी बंद करणे, सुसज्ज शेतकरी भवन मार्केट कमिटी यार्ड परिसरात उभारणे, यासह इतर प्रश्नांसाठी छावा दलाचे विनायक भिसे यांनी बाजार समितीला मध्यंतरी निवेदन दिले होते. वरील प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. बाजार समितीवर सध्या प्रशासक असल्याने मार्ग काढत बाजार समितीने छावा दलास लेखी पत्र दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, सध्या प्रशासक असल्याने कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये. छावा दलाचे विनायक भिसे यांनी ता. सहा जून रोजी बाजार समितीतील मोंढ्यात हळदीसह इतर शेतमालावर चालु असलेली कटी बंद करावी, कार्यक्षेत्रांतर्गत हळदीसह इतर शेतमालावर कोणत्याही प्रकारची कटी आकारण्यात येऊ नये, यार्डमध्ये मालवाहू वाहन वजनकाटे बसविण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल व्यापाऱ्यांच्या वजन काट्यावर जाण्यापूर्वी शेतकऱ्याला त्यांच्या मालाचे वजन किती आहे, हे समजणे आवश्यक असल्याने वजनकाटा स्थापित करून अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने सुरू करावी, संत नामदेव हळद मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वेब ब्रिजची उभारणी करावी, मार्केट यार्ड परिसरात शेतकऱ्यांच्या विश्रांतीसाठी ५० बेडचे व महिला शेतकऱ्यांसाठी सुसज्ज सर्व सोयीसह शेतकरी हॉस्टेल प्रभावाने नवीन बांधणी उपलब्ध करून द्यावे, यासाठी निवेदन दिले होते.
एका महिन्याच्या आत या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावर बाजार समितीने शुक्रवारी (ता. १०) त्यांना लेखी पत्र दिले. ज्यामध्ये बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपल्याने सध्या प्रशासकाची नियुक्ती आहे. ग्रेन मार्केट यार्ड व संत नामदेव हळद मार्केट यार्ड हे दोन वेगवेगळ्या अपुऱ्या जागेत विस्थापित झालेले असून, जागेचा प्रश्न मोठा असल्याने बाजार समितीच्या निवडणुका झाल्यावर नवीन संचालक मंडळ स्थापन झाल्यावर दोन्ही मार्केट यार्ड एकत्रित करून संत नामदेव हळद मार्केट स्थलांतराचा विचार सुरू असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्रानुसार छावा दलाचे समाधान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Web Title: Hingoli Market Committee Replied Soonwarned Of Agitation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..