
हिंगोली : हळदीची आवक वाढली मात्र, भावात घसरण
हिंगोली : बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मागच्या काही दिवसापासून हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एका दिवसात सात ते आठ हजार पोत्याची आवक होत आहे. मात्र, भावात घसरण सुरू झाली असून काही दिवसापूर्वी साडेआठ हजार रुपये असलेला दर आता सहा ते सात हजार रुपये झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हिंगोली येथील हळदीचे मार्केट जिल्हाभरासह विदर्भात देखील प्रसिद्ध आहे. हिंगोली जिल्ह्यालगत वाशीम जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. येथील मार्केटमध्ये हळदीला दर देखील चांगला मिळतो. मागील काही दिवसापासून येथील मार्केटमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एका दिवसात सहा ते सात हजार पोत्याची आवक दोनशे ते तीनशे वाहनातून झाली होती. मात्र, भावात घसरण झाली आहे. काही दिवसापुर्वी आठ ते साडेआठ हजार रुपये क्विंटल हळदीला दर होता. आता मात्र सहा ते सात हजार रुपये दर झाला आहे.
येथील मार्केट यार्डात लिलाव पध्दतीने हळदीची विक्री केली जाते. त्यामुळे हळद उत्पादक येथे हळद विक्रीसाठी आणतात. येथे चांगल्या प्रतीच्या हळदीचा लिलाव झाला. ज्यामध्ये सहा ते सात हजार रुपये भाव मिळाला. हळदीची आवक वाढत असल्याने हळदीचे दर घसरले असल्याचे शेतकरी सांगत असून दर कमी झाल्याने नुकसान होत असल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हिंगोली येथील मोंढ्यात हळदीला चांगला भाव मिळतो. यामुळे येथे हळद विक्रीसाठी आणली आहे. मात्र, येथे हळद विक्रीसाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आवक वाढल्याने भावात घसरण झाली असल्याची चर्चा उत्पादक करत असून त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
- रमेश काळे, हळद उत्पादक.