
Hingoli : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणे अंगलट
हिंगोली : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १,४६५ वाहनधारकांकडून ११ लाख ७६ हजार २५० रुपयांचा दंड वाहतूक शाखेच्या पथकाने वसूल केला आहे. ही कारवाई मागील आठवड्यात नऊ ते १५ जानेवारी या कालावधीत करण्यात आली.
नऊ ते १५ जानेवारीपर्यंत शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्या १३४१ वाहनांवर कार्यवाही करून त्यांच्याकडून नऊ लाख ३७ हजार २५० रूपये दंड व अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या १२४ वाहनधारकांकडून दोन राख ३९ हजार रूपये अशा एकूण १,४६५ वाहनधारकांकडून ११ लाख ७६ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी दुचाकी धारकांनी हेल्मेटचा वापर करावा, अन्यथा मोटार वाहन कायद्याप्रमाणे ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे राष्ट्रीय, राज्य महामार्गावर वाहन चालविताना वेग मर्यादेपेक्षा जास्त स्पीडने वाहन चालवू नये, अन्यथा मोटार वाहन कायद्याप्रमाणे दोन हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल, असे पोलिस विभागातर्फे सांगण्यात आले.
तसेच दंड आकारण्यात आलेल्या वाहनधारकांनी १५ दिवसांच्या आत रीतसर दंड भरून दंड भरल्याची पावती घ्यावी, अन्यथा मुदत संपल्यानंतर वाहन डिटेन करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. वरील कार्यवाही पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक ए. आय. सय्यद व वाहतूक शाखेचे सर्व पोलिस अंमलदार यांनी केली आहे.