Hingoli : ‘ऑनलाइन’ विक्रीचा व्यापाऱ्यांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online shopping

Hingoli : ‘ऑनलाइन’ विक्रीचा व्यापाऱ्यांना फटका

हिंगोली : दिवाळीनिमित्त कोविडचे कोणतेही निर्बंध नसल्याने नागरिकांनी मनसोक्त खरेदी केली. हा सण ‘कॅश’ करण्यासाठी व्यापाऱ्यांसह ऑनलाइन कंपन्यांनी चांगलीच सूट दिली. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातून ऑनलाइन खरेदीला अधिक पसंती मिळाली. ऑनलाइन संस्कृतीचा फटका लहान व मध्यम विक्रेत्यांना बसला. लाखोंच्या उलाढालीत स्थानिक विक्रेत्यांना नुकसानीचा सामना करावा लागला.

नागरिकांनी ऑनलाइन खरेदी न करता स्थानिक दुकानातून खरेदी करावी, अशी हाक व्यापाऱ्यांनी दिली होती. मात्र, ऑनलाइन कंपन्यांतर्फे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत देण्यात आलेली विशेष सूट, याशिवाय अवघ्या तीन ते चार दिवसांत वस्तू घरपोच मिळत असल्याने यावर्षी दिवाळीत ऑनलाइन खरेदीत वाढ झाली. परिणामी, स्थानिक बाजारपेठेतील व्यावसायिक अडचणीत सापडले.

अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, पादत्राणे यासारख्या हजारो वस्तू ऑनलाइन विक्री संकेतस्थळावर उपलब्ध होत आहेत. खरेदी केलेल्या वस्तू तीन ते चार दिवसांत घरपोच मिळतात. या वस्तू तांत्रिक अडचण असेल तर परत करण्याची सुविधा असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे ग्राहकांचा कल ऑनलाइन खरेदीकडे वाढलाय. ऑफर्स आणि सूटच्या जाळ्यात ग्राहक ऑनलाइन खरेदीत अडकत चाललेले आहेत. त्यामुळे दिवाळीत शहरातील दुकानांमध्ये तुरळक गर्दी बघायला मिळाली. तरुणाई इंटरनेटवर जास्त वेळ व्यस्त असते. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करण्यात तरुणांची संख्या जास्त दिसत आहे.